महायुतीची ‘गट्टी’ तरीही भाजपा ‘हट्टी’?; जागा कमी मिळाल्याची ‘सल’ खुपतेच?
- उमेदवारीसाठी १७ चेहरे शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटात घुसवलेच?
– मुख्यमंत्रीपदासाठी निवडणुकीआधीपासूनच लावली जोरदार फिल्डिंग?
मुंबई (बाळू वानखेडे) – विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात भारतीय जनता पक्षाने १४८च्या जवळपास जागा घेतल्या आहेत. सर्वात जास्त जागा घेऊनही आपल्याला कमीच जागा मिळाल्याचे भासवत, भाजपने चक्क आपल्या १७ चेहर्यांना शिंदे गट व अजित पवार गटात घुसवत उमेदवारी मिळवली असल्याचे दिसून येत आहे. यावरून महायुतीत ‘उपर से टामटूम अंदर से रामजाने’ अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे जाणवत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख संपली असून, राज्यात २८८ जागांसाठी जवळजवळ ७ हजारांच्यावर उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. परवा दि. ४ नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची तारीख असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीच्या जागावाटपातही चांगलीच ताणाताणी दिसून आली, असे असताना अजूनही काही जागांवरील उमेदवारीबाबत चित्र स्पष्ट नाही. जागावाटपात सध्यातरी भाजपच्या वाट्याला १४८, शिवसेना शिंदे गटाला ८०, अजितदादा पवार गटाला ५३ तर मित्र पक्षाला ५ जागा देण्यात आलेल्या आहेत. तर दोन जागांचे चित्र अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती आहे. भाजपाने गोडी गुलाबी तर प्रसंगी दबाव टाकत महायुतीत १४८ एवढ्या सर्वात जास्त जागा पदरात पाडून घेतल्या, असे असताना आपल्याला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जागा कमीच मिळाल्या, असे मनोमन वाटत असल्याने चक्क आपल्या १७ चेहर्यांना शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटात घुसवून उमेदवारी मिळवली आहे.
अर्थात, हे उमेदवार निवडून आले तरी ते आपलेच आहेत, असा कयास भाजपाने लावला आहे. यामध्ये भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर लोहामधून, निशीकांत पाटील इस्लामपूर, संजयकाका पाटील तासगाव, राजकुमार बडोले अर्जुनी मोरगाव यांनी अजित पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवली आहे तर नीलेश राणे कुडाळ, संजय जाधव कणंद, राजेंद्र गावित पालघर, विलास तरे बोईसर, संतोष शेट्टी भिवंडी, मुरजी पटेल अंधेरी पूर्व, शायना एन.सी. मुंबादेवी, अमोल खताळ संगमनेर, अजित पिंगळे धाराशिव, दिग्विजय बागल करमाळा, विठ्ठल लंघे नेवासा व बळीराम सिरस्कार बाळापूर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत, ते आता धनुष्यबाणावर लढणार आहेत. यातील बळीराम सिरस्कार हे वंचित आघाडीच्या तिकीटावर दोन टर्म बाळापूर विधानसभेचे आमदार होते. गेल्या निवडणुकीत तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी व नंतर भाजपात प्रवेश केला होता. एनकेन प्रकारे जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपाचा खटाटोप यातून दिसतो, त्यामुळे आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, ही भाजपाची खेळी आता लपून राहिलेली दिसत नाही.