‘महायुती’चा ‘खेळखंडोबा’; नेमका अधिकृत उमेदवार कोण? त्याला जबाबदार कोण!
- महाआघाडीच्या डॉ. शिंगणेंची प्रचारात आघाडी, तर महायुतीचा उमेदवार कळेना?
– शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस? मतदार संभ्रमात!
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? या खेळखंडोबाला जबाबदार कोण! अशी चर्चा जनमाणसात सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे या दोघांनाही महायुतीने रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. यात सर्वात मोठी गोची भाजपची झाली असून, महायुतीत साथ कुणाला द्यायची? याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर टाकला गेला आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित होऊन १० दिवस उलटले आहेत. त्यांची प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अर्धाअधिक मतदारसंघ पायाखाली घालीत भेटीगाठी घेऊन घड्याळ नव्हे आपली तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी असल्याचे पटवून सांगावे लागत आहे. कारण १९९९ पासून घड्याळ या निशाणीवर निवडणूक लढविलेली असल्याने त्यांची गोची होत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे हे घड्याळ या निशाणीवर निवडणूक लडवित आहे. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर हेही धनुष्यबाण निशाणी घेऊन निवडणूक रिंगणात आहेत. खरंतर हा महायुतीचा खेळखंडोबा नेमका कोणी केला? यामागे कुणाचा हात आहे? याची चर्चा मतदारसंघात जनमाणसात सुरू आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांना तगडी लढत देण्यासाठी महायुती एकसंघ राहायला पाहिजे होती. पण सिंदखेडराजा मतदारसंघात बिघाडी झाल्याने चौरंगी लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यातच ३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील माघारी किती फिरतात, आणि कायम किती राहतात? यावर चित्र अवलंबून आहे.
महायुतीने दोघांनाही एबी फॉर्म देऊन नेमकं त्यांना काय साध्य करायचे? केवळ मतदारांना संभ्रमात टाकून मतविभागणी करण्याचा डाव खेळला जात आहे का? याचे उत्तर द्यावे.
– सौ. साधना अशोक खरात, सरपंच, शिंदी
—
माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना शेवटपर्यंत झुलवत ठेऊन दोन उमेदवार देणे म्हणजे मतदारांची चेष्टा करण्यासारखा प्रकार महायुतीच्या नेत्यांनी चालवला आहे. या घटनेमागे झारीतील शुक्राचार्य कोण?
– दिलीप बेंडमाळी, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती
भाजपाचे नेते सुनील कायंदे आणि अंकूर देशपांडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यांनी माघार घेतली तर भाजप नेमका कोणत्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत. ही जर-तरची भाषा चालत आलेली आहे. आझाद समाज पार्टीचे रामदास कहाळे हे मैदानात उतरले आहेत. त्यांचा फटका सर्वाधिक वंचित बहुजन आघाडीच्या सौ.सविता मुंढे यांना बसू शकतो. त्याच बरोबर दिलीप खरातही मैदानात आहेत. स्वतंत्र भारत पक्षाचे काकडे, शिवानंद भानुसे हे उमेदवार ही त्रासदायक ठरू शकतात. कोण कोणत्या पक्षाचे घटक आहेत, आणि महायुतीमध्ये इतर पक्षांचे कोण? महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि इतर पक्षाला सोडलेल्या जागा व्यतिरिक्त त्या पक्षातील किती अपक्ष आहेत? यावरही निवडणूक अवलंबून आहे. आज मतदारसंघात महायुतीचीच चर्चा अधिक होत असून, नेमका अधिकृत उमेदवार कोण? हेच कळायला मार्ग नाही. दोघांनीही मीच महायुतीचा उमेदवार असल्याचे ठासून सांगितले असून, मतदार संभ्रमात आहे.