– मेहकर-लोणार मतदारसंघात पहिल्याच टप्प्यांत प्रचारात अभूतपूर्व आघाडी
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी तसेच शेतकरी संघटना क्रांतीकारीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी प्रचारात आघाडी घेतल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू चांगलीच सरकली आहे. डॉ. ऋतुजाताई यांच्याविरोधात प्रचारासाठी काहीच मुद्दे नसल्याने त्यांनी त्यांच्याविरोधात अफवांचा बाजार गरम केला आहे. परंतु, मतदार मायबाप व नागरिकांनी या अफवांकडे लक्ष देऊ नये, मला विधानसभेत पाठवून या मतदारसंघाचा कायापालट करण्याची संधी द्यावी, असे विनम्र आवाहन डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी केलेले आहे.
डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभी झालेली शेतकरी चळवळ व वंचित बहुजन आघाडीची पोलादी फळी यामुळे मतदारसंघात त्यांचे पारडे जड झालेले आहे. ऋतुजाताईंच्या राजकीय विरोधकांना त्यांच्या विरोधात प्रचारासाठी एकही मुद्दा हाती लागत नाही. तसेच, डॉ. ऋतुजाताई या विकासकामांवर प्रश्न विचारत असल्याने लोकप्रतिनिधींची मोठी पंचाईत होत आहे. राज्यातील महायुती सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, उद्योजक, शेतमजूर, कष्टकरी हे सर्वच घटक हवालदिल झालेले आहेत. तसेच, शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात विद्यमान लोकप्रतिनिधींना अपयश आले असून, मेहकर व लोणार मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूरवर्ग सद्या प्रचंड संतप्त आहेत. त्यांचा हा संताप आता मतदान यंत्रातूनच उफळून बाहेर येणार आहे.
गावोगावी ऋतुजाताई चव्हाण, शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित आघाडीच्या पदाधिकार्यांना जोरदार प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू चांगलीच सरकलेली दिसते आहे. या मतदारसंघात डॉ. ऋतुजाताई चव्हाण व विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच खरी लढत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्याविरोधात अफवा पसरविण्याचे काम काहीजण हेतुपुरस्सरपणे करत आहेत. परंतु, मायबाप जनतेला सर्व वस्तुस्थिती माहिती असल्याने जनता त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवणार नाही. तरीदेखील विजयाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांकडून गैरसमज निर्माण करणार्या अफवांच्या बातम्या पसरवल्या जाऊ शकतात, त्याला मेहकर व लोणार तालुक्यातील नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी केलेले आहे.