मनोज जरांगे पाटलांची विधानसभा निवडणुकीतून माघार; अर्ज मागे घेण्याचे समर्थकांना आदेश!
- ठरल्याप्रमाणे मुस्लीम व दलित समाजाने यादी दिली नसल्याने माघार घेण्याचा निर्णय
– ही माघार नसून गनिमीकावा; कुणाला पाडायचे ते समाजाने ठरवावे!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज (दि.४) सकाळी पत्रकार परिषद घेत, त्यांनी ही घोषणा केली. मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे पाटील यांनी मुस्लीम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मित्रपक्षांची यादीच आली नसल्याने, आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नसल्याचे म्हणत जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ‘देर आये दुरुस्त आए..’, असे म्हणत भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली.
मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.४) सकाळी आंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, की आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला, असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी असो की, महायुती असो. दोन्ही कडचे नेते हे सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणालाही निवडून आणा, असेदेखील म्हणत नाही. केवळ माझे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगून, माझ्या आंदोलनात मला कोणी डिचवले तर मी त्याला सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी ठणकावले. ही माझी माघार नसून हा गनिमी कावा असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. याला पाड, त्याला पाड म्हणायची इच्छा नाही, पण मला खवळलं तर बघू, दोन्ही शहाणे नाहीत. तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडणू आणा, असेदेखील ते यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक दिवसाला भूमिका बदलणारा व्यक्ती आहे. मुंबईच्या वेशीवरूनदेखील ते माघारी फिरले होते. त्यांचा राजकारण आणि निवडणुकीबद्दल अजिबात अभ्यास नाही, अशी टीका ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगे पाटील हे या आधी 130 उमेदवारांना पाडायची भाषा करत होते, त्याचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जरांगे हे केवळ बारामतीच्या सांगण्यावरुनच भूमिका घेत असल्याचा आरोपदेखील हाके यांनी केला आहे. निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी पळ काढला असल्याची टीका देखील हाके यांनी केली आहे.