भारतीय सैन्यदलातील जवान अपघातात ठार; गोरेगाव गावावर शोककळा!
- सैन्यदलाने दिली सलामी; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सर्वत्र दीपावली सण मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना गोरेगाव गावावर शोककळा पसरली. गोरेगाव येथील सैन्यदलातील जवानाचा दि. ३१ ऑक्टोबररोजी रात्री मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. मृतक सैनिकांचे नाव सिध्देश्वर वसुदेव पंचाळ (वय ३१) वर्ष आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली. लष्करी सन्मानासह शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
गोरेगाव येथील सिध्देश्वर वसुदेव पंचाळ हे ८ वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. काश्मीर येथे सशत्र दलात ७ वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची बदली उत्तराखंड येथे बदली झाली. वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमाचे आयोजन ५ नोव्हेंबर रोजी होते. त्यानिमित्ताने सिध्देश्वर हे २८ ऑक्टोबर रोजी घरी गोरेगाव येथे आले होते. दीपावली आणि वडीलांच्या श्राध्दाची तयारी करण्यासाठी सामानाची जमवाजमव करीत होते. काल ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ७:३० वाजता साखरखेर्डा येथून गोरेगाव येथे मोटारसायकल वरुन जात असताना गोरेगावजवळ एका ट्रॅक्टरची धडक त्यांच्या मोटारसायकला बसली. त्यात सिध्देश्वर पंचाळ हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चिखली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसरताच एकच कल्लोळ माजला. या कुटुंबातील चार व्यक्ति भारतीय सैन्यदलात आहेत. त्यातील याअगोदर एकच वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात सेवानिवृत्त काका अरुण पंचाळ आणि वडील वसुदेव पंचाळ यांचा मृत्यू झाला होता. त्या शोकसागरात पंचाळ कुटुंबीय असताना हा तिसरा आघात झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हिंगोली येथील भारतीय सशस्त्र सेवादल तुकडी सोलडी एनएसएसबी ज्यमू बिहारचे कमांडर मनिष कुमार यांच्या सुचनेनुसार गोरेगाव येथे दाखल झाली. भारतीय सैन्य दलाच्या तुकडीचे पीएसआय राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वाहनातून पार्थिव देह स्मशानभूमीत नेण्यात आला. त्याठिकाणी भारतीय सैन्य दलाने सलामी दिली. तर आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दाजंली अर्पण केली. त्याच बरोबर पीएसआय राजेंद्र सिंह यांनी सैन्य दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, माजी उपाध्यक्ष राम जाधव, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, भारतीय सैन्य दलातील कॅप्टन नरेंद्र शालीग्राम पंचाळ, शिवसेना नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, पैनगंगा सहकारी सुत गिरणीचे कार्यकारी संचालक बबनराव लोढे यासह आजी माजी सैन्य दलातील अधिकारी, सेवानिवृत्त सैनिक, परिसरातील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिक सिध्देश्वर पंचाळ यांच्या पाठीमागे आजी, आई, पत्नी निकिता, अडीच वर्षांची मोनाली असा मोठा परिवार आहे. या शोकाकुल वातावरणाचे सूत्रसंचलन अजीम नवाज राही यांनी केले.