‘माधवं’ फॉर्म्युल्याला जरांगे पाटलांकडून ‘एम-एम-डी’ फॉर्म्युल्याने प्रत्युत्तर!
- महाराष्ट्राच्या राजकारणात नवे 'सोशल इंजिनिअरिंग' भाजपचा खेळ बिघडविणार?
– मराठा, मुस्लीम व दलित एकत्र आले तर राज्यात सत्तापरिवर्तन अटळ असल्याची राजकीय जाणकारांची माहिती
जालना/मुंबई (खास प्रतिनिधी) – माळी-धनगर-वंजारी हा ‘माधवं फॉर्म्युला’ स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी निर्माण करून राज्यात सत्तापरिवर्तन केले होते, व भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आणले होते. आता असेच सोशल इंजिनिअरिंग मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तयार करण्याचे ठरवले असून, त्यासाठी त्यांनी मराठा-मुस्लीम-दलित असा ‘एमएमडी फॉर्म्युला’ निर्माण करून भाजपच्या ‘माधवं फॉर्म्युला’ला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली असल्याचे दिसून येत आहे. हा फॉर्म्युला घेऊन ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले तर राज्यात सत्तापरिवर्तन अटळ आहे, अशी माहिती राजकीय जाणकारांतून पुढे येत आहे.
विधानसभा निवडणुकीत मराठा मतांच्या साथीला दलित आणि मुस्लीम मतांची मोट बांधण्याची रणनीती मनोज जरांगी पाटील यांनी आखल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी काल अंतरवली सराटी येथे झालेल्या सर्वधर्मिय बैठकीत मूर्तरूप आल्याचे पुढे आले आहे. तसेच, जरांगे पाटील यांनीदेखील राज्यात परिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना एकत्र आणल्याचे जाहीर केले आहे. काल त्यांनी अंतरवली सराटीत मुस्लीम धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत मराठा-दलित-मुस्लीम एकत्र येण्यावर एकमत झाले असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता आम्ही एकत्र आलो असून, सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला. राज्यातील मोठे असलेले हे तीन समाज एकत्र आले असले तरी, कोणते मतदारसंघ आणि उमेदवार कोण असणार? हे येत्या ३ नोव्हेंबरला जाहीर करणार असल्याचेदेखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्या नंतर इतर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घ्यायची असल्याचे जरांगे पाटील यांनी सूचविलेले आहे. सर्व मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र, आम्ही एकाला उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर इतरांनी अर्ज मागे घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
दलित-मराठा-मुस्लीम शहाणे होणे गरजेचे आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. कधी चेहरा न बघितलेली शेतकर्यांची मुले आमदार होतील. मुस्लीम समाजातील मुलांनाही आमदार, मंत्री होता येईल. हे सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही समिकरणे जुळायला हवी, त्यासाठी बैठक घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, की ‘ज्यांच्याशी ४० वर्षे जमले नाही अशा लोकांना सोबत घेऊन ‘यांनी’ सत्ता मिळवली. त्यांच्यासारखा विश्वासघातकी माणूस आज राजकारणात कुणीच नाही.’
आनंदराज आंबेडकर यांच्यासह मुस्लीम धर्मोपदेशक व बौद्ध धर्मगुरूंनी काल (दि.३१) अंतरवाली सराटी या गावी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील, मुस्लीम धर्मोपदेशक मौलाना सज्जाद नौमानी व आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मौलाना नौमानी यांनी मनोज जरांगे यांना भारतभर फिरण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे यांना हिंदी भाषेत बोलता येत नसल्यामुळे ते महाराष्ट्राबाहेर जाण्याचे टाळतात, हे कळल्यावर नौमानी त्यांना म्हणाले, ‘अनुवादक म्हणून मी तुमच्याबरोबर देशभर फिरेन’. ‘भारताच्या संविधानासारखं संविधान जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात अस्तित्वात नाही. शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित आणि महिलांच्या हक्कांच्या बाबतीत आपले संविधान सर्वोत्कृष्ट आहे. या संविधानाची निर्मिती करताना आणि देशाची घडी बसवताना महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील जनतेने ही गोष्ट गांभीर्याने पाहिली पाहिजे. आपल्या आजवरच्या आदर्श व्यक्तींच्या पावलांवर पाऊल टाकत महाराष्ट्राला व देशाला पुढे नेले पाहिजे. देशातील अनेक मोठमोठे नेते, ज्यांनी देश घडवला, थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक या महाराष्ट्रातूनच आपल्याला मिळाले. त्यातील काहींशी तुम्ही सहमत असाल अथवा नसाल, तरीदेखील या राज्याने देशाला पुढे नेतील असे लोक जन्माला घातले आहेत. ही या भूमीची क्षमता आहे. मनोज जरांगे पाटील हेदेखील त्यापैकी एक ताजं उदाहरण आहे. मी उत्तर प्रदेशवरून येथे आलो आहे. मला मराठी बोलता येत नाही त्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला मराठी नीट बोलता येत नाही आणि मनोज जरांगे यांना हिंदी येत नाही. त्यामुळे मी त्यांना हिंदी शिकवणार आहे. जेणेकरून मनोज जरांगे देशभरातील लोकांना संबोधित करू शकतील. देशाच्या कानाकोपर्यात जाऊ शकतील. मला मनोज जरांगे यांनी सांगितले की त्यांना हरियाणामधून बोलावणे आले होते. परंतु, त्यांना हिंदी येत नाही म्हणून ते तिकडे गेले नाहीत. पण मी त्यांना सांगितले आहे. तुम्हाला हिंदी येत नाही म्हणून कुठे जाणे टाळू नका. तुम्हाला मान्य असेल तर मी तुमच्याबरोबर देशभर फिरेन. तुमचा अनुवादक म्हणून सर्वत्र यायला तयार आहे. तुमच्यासाठी मी मराठीतून हिंदीत अनुवाद करेन. तुम्ही देशभर फिरा, असेही मौलाना नौमानी यांनी याप्रसंगी सांगितले.
मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज, सलाइन लावले!
गेल्या आठवडाभरापासून मनोज जरांगे पाटील हे दररोज सातत्याने बैठका घेत आहेत. अनेक राजकीय नेते, इच्छूक उमेदवार त्यांना रात्री- बेरात्री, पहाटे भेटीसाठी येत आहेत. या अतिबैठकांमुळे त्यांचे पाय सुजले आहेत. वेदनाही होत असल्याने उपचार सुरु आहेत. बुधवारी त्यांना सलाइनही लावले होते. ‘दोन दिवस सर्वांशी चर्चा करत आहोत. त्यामुळे पाडव्यापर्यंत कुणीही आंतरवालीत येऊ नये’ असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणुकीसाठीसाठी माझ्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर देऊ नका. मी पैशांवर पाठिंबा देतो असे सांगणार्याचे नाव कळले तर मी त्या माणसाचा मुडदाच पाडणार. इथे पैशांचा विषय नाही तर समाजाचा विषय आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात मुस्लीम, दलित समाज मराठा समाजाला साथ देणार का?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मराठा राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपने माळी-धनगर-वंजारी हा ‘माधवं फॉर्म्युला’ निर्माण करून राज्यात सोशल इंजिनिअरिंगद्वारे सत्तापरिवर्तन घडवत १९९५ मध्ये सत्ता ताब्यात घेतली होती. त्यातून माळी, धनगर व वंजारी समाजातून अनेक चांगले नेतृत्व पुढे येऊ शकले होते. त्याचीच पुनर्रावृत्ती आता मनोज जरांगे पाटील हे करत असल्याचे दिसून येत आहे. राज्याची सत्ता हातात आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य नाही, याची जाणीव मनोज जरांगे पाटील यांना झाली आहे. तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांत विभागलेल्या मराठा समाजाच्या जोरावर राज्यात सत्ता आणणेही शक्य नाही. कारण, सर्व ओबीसी भाजपच्या बाजूने एकवटलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुस्लीम व दलित समाजाला सोबत घेऊन नवे सोशल इंजिनिअरिंगचे सूत्र अवलंबविले असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.