– तब्बल १८ लाखांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
चिखली (रघुनाथ गवई) – चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कव्हळा येथील रतन बाजीराव आढाव (वय ४४ वर्ष) यांच्या न्यू क्रांती कृषी केंद्राला आज (दि.४) पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉटसर्किटने आग लागली, या आगीत संपूर्ण कृषी केंद्र जळून खाक झाले. तसेच, त्यांची सुझुकी बलेनो कारदेखील जळून खाक झाली असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या आगीत त्यांचे १८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.
कव्हळा येथील मारुती मंदिराला लागून ग्रामपंचायतीजवळ रतन बाजीराव आढाव यांचे जुने न्यू क्रांती कृषी केंद्र असून, त्यांचा उदरनिर्वाह याच दुकानावर अवलंबून आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने काल भाऊबीजेचा सण आटोपून आढाव कुटुंब गाढ झोपेत असताना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या कृषी केंद्राला आग लागली, या आगीत संपूर्ण कृषी केंद्र जळून खाक झाले. दुकानाच्या बाजूला उभी असलेली मारुती बलेनो कार (एमएच ३४ बीआर ५३६२) देखील जळून खाक झाली. गावकर्यांनी बोअरवेल पंप सुरू करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, पण आगीने संपूर्ण कृषी केंद्र आपल्या भक्ष्यस्थानी घेतले होते. या आगीमध्ये कृषी केंद्रातील कृषी औषधी, खते, बी बियाणे, सोयाबीन बियाणे, स्प्रिंकलसह व इतर साहित्य आणि बलेनो कारसह जवळपास १८ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस स्टेशन करीत आहेत.