चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघातून त्यांचे सहकारी व शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या विधानसभेसाठी आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, ‘रवीभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाहीत, दिले तर एक रूपयांची शर्यत लावू’, अशी शर्यत विनायक सरनाईक व ज्येष्ठ पत्रकार तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे यांच्यात लागली होती. त्यानुसार, आजअखेर तुपकरांनी सरनाईक यांना उमेदवार घोषित न केल्याने सरनाईक यांनी आपला नामंकन अर्ज मागे घेतला आहे. ठरल्याप्रमाणे सरनाईक हे शर्यत हरल्याने त्यांनी एक रूपया श्री सांगळे यांना फोन पे करत दिला आहे. या शर्यतीची पत्रकारिता तसेच शेतकरी चळवळीत एकच खमंग चर्चा सुरू होती.
राज्यात २५ व बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली होती. त्यानुसार, त्यांचे सर्व सहकारी कामाला लागले होते. शेतकरी नेते विनायक सरनाईक हे रविकांत तुपकरांचे उजवे हात असून, युवा अवस्थेपासून त्यांनी स्वतःला शेतकरी चळवळीसाठी वाहून घेतले आहे. शेतकर्यांच्या हितासाठी आंदोलन करतानाचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. तसेच, शेतकर्यांना न्याय देण्यासाठी अनेकप्रसंगी त्यांनी कायदादेखील हातात घेतलेला आहे. नुकतेच, त्यांनी शेतकर्यांच्या मागण्यांसाठी प्राणांतिक उपोषण केले होते. परिणामी, सरकारला पीकविमा रक्कम व वादग्रस्त भक्ती महामार्गदेखील रद्द करावा लागला होता. अशा या लढवय्या शेतकरी नेत्याला शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चिखली विधानसभा मतदारसंघातून निश्चित उमेदवारी देतील, अशी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना तसेच स्वतः सरनाईक यांनाही आशा होती. त्यासाठी त्यांनी आपला नामांकन अर्जदेखील दाखल केला होता. परंतु, रविकांत तुपकरांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा न केल्याने आजअखेर सरनाईक यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
दरम्यान, ‘रवीभाऊ तुम्हाला चिखलीतून उमेदवारी देणार नाही’, अशी एक शर्यत ज्येष्ठ पत्रकार व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनी विनायक सरनाईक यांच्याशी लावली होती. त्यासाठी त्यांनी आपला राजकीय अभ्यास आणि काही राजकीय ठोकताळेदेखील सरनाईक यांच्यापुढे सविस्तरपणे मांडले होते. तरीदेखील आपल्याला शेतकरी संघटना क्रांतीकारीकडून पाठिंबा मिळेल, व रविकांत तुपकर हे आपली उमेदवारी जाहीर करतील, असे विनायक सरनाईक सांगत होते. परंतु, तसे झाले नाही. परिणामी, पुरूषोत्तम सांगळे ही शर्यत आज जिंकले आहेत. त्यानुसार, शर्यतीत हरल्यानंतर ठरल्याप्रमाणे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी शर्यतीचा एक रूपया श्री सांगळे यांना फोन पे केला आहे. या शर्यतीची पत्रकार तसेच शेतकरी चळवळीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू होती.
————