सिंदखेडराजा मतदारसंघात चौरंगी लढत अटळ!
- 'महायुती'चा तिढा कायम; भाजपची भूमिका राहणार निर्णायक!
– भाजपने आज बोलावली तातडीची बैठक; मनोज कायंदेंच्या समर्थनार्थ अनेकांचे ट्वीट!
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात ३५ पैकी, १७ उमेदवार राहिले असून, १८ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले आहे. यात माजी समाजकल्याण सभापती अभय चव्हाण, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांचा समावेश आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांचा अर्ज कायम राहिल्याने या मतदारसंघात भाजप आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवाय, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती आघाडीच्या नेत्या गायत्री शिंगणे यांचाही अर्ज कायम असून, त्या अपक्ष लढत देण्यावर ठाम असल्याने महाआघाडीतही पेच कायम आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात १७ उमेदवार कायम असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डॉ.राजेंद्र शिंगणे हे प्रमुख निवडणूक रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सौ. सविता मुंढे ह्याही निवडणूक रिंगणात आहेत. त्याच बरोबर स्वतंत्र भारत पक्षाचे दत्तात्रय काकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रा. दंतु रामभाऊ चव्हाण, डॉ. सुरेश घुमटकर, अब्दुल हाफिज अ. अजीज, कुरेशी जुनेद रौफ शेख, गायत्री गणेश शिंगणे, बाबासाहेब बन्सी म्हस्के, भागवत देवीदास राठोड, रामदास मानसिंग कहाळे, विजय पंढरीनाथ गवई, सुधाकर बबन काळे, सुनील पतिंगराव जाधव, अॅड. सै . मोबीन सय्यद नईम हे रिंगणात आहेत. उद्या, दि. ५ नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले असून, महाविकास आघाडीच्यावतीने डॉ.राजेंद्र शिंगणे हे एकमेव उमेदवार आहेत. कोठेही बंडखोरी होऊ नये म्हणून त्यांनी अनेकांचे नामांकन अर्ज मागे घेण्यात सिंहांचा वाटा राहिला आहे. भाजपनेही पक्षादेश बाळगून आपले अर्ज मागे घेतला आहे. परंतु, महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज देवानंद कायंदे यांचे अर्ज कायम असल्याने नेमका महायुतीचा उमेदवार कोण, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
भाजपची भूमिका निर्णायक आज जरी असली तरी दि. ५ नोव्हेंबररोजी भाजपची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत त्यांचा निर्णय होणार आहे. आज बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांना सहकार्य करण्याचे ट्वीट केले आहे. तर महाविकास आघाडी एकसंघ असल्याने माजी समाजकल्याण सभापती अभय चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत, डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. कु. गायत्री शिंगणे या मैदानात असल्या तरी त्यांच्या जवळ अनुभव आणि कार्यकर्त्यांची वाणवा दिसून येत आहे. तथापि, त्यांच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाटही दिसून येत आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे दत्तात्रय काकडे यांची प्रचाराची धुरा शेतकरी संघटनेचे नेते वामनराव जाधव यांच्या खांद्यावर आहे. या अगोदर त्यांनी दोन विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. त्यांचा अनुभव काकडे यांना कितपत होतो, हे पाहावे लागेल. रामदास मानसिंग कहाळे हे पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान राहिलेले आहे. त्याचा फायदा त्यांना कितपत होईल, हेही लक्षात येणार आहे.
सहा मतदारसंघातील ‘बंडोबा’ झाले थंड; सिंदखेडराजात मात्र ‘दोस्तीत कुस्ती’!