महाराष्ट्रातील संतांचा मराठी माणसाच्या मानसिक आणि भावनिक जडण-घडणीत सिंहाचा वाटा राहिला आहे. संतांनी अध्यात्मिकतेबरोबरच समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. प्रत्येक काळाची एक युगप्रवृत्ती असते. मध्ययुगीन कालखंडात साहित्य हे धर्म व ईश्वरकेंद्री असल्याचे लक्षात येते. अलीकडच्या काळातील साहित्य अधिक प्रमाणात मनुष्य व देश केंद्री असल्याचे निदर्शनास येते. आधुनिक काळातील संतांच्या साहित्यात ईश्वर, धर्म, अध्यात्म आणि समाजप्रबोधनबरोबरच राष्ट्रीयत्वाचे संदर्भ ठिकठिकाणी आढळून येतात. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या ‘अनुभूति’ ग्रंथात मानवी जीवन व्यापून टाकणारे असंख्य विषय आलेले दिसून येतात. त्याबरोबरच महाराजांच्या अभंगातून ठिकठिकाणी देशभक्तीचेही दर्शन घडत जाते.
संत शुकदास महाराज आपल्या ‘अनुभूति’ ग्रंथातील १७८ क्रमांकाच्या अभंगात म्हणतात की,
देवा धर्मासाठी, आमचे जीवन । घेतले वाहून, कायमचे।।
तसेच हो आम्ही, मातृभूमीवर । करितो अपार, प्रेमसुद्धा।।
याशिवाय बाकी, माहित असेना । गरज दिसेना, कशाचीच।।
शुकदास म्हणे, तोचि देव भक्त । होतो देशभक्त, खरोखर।।
आम्ही देवधर्मासाठी आमचे संपूर्ण जीवन अर्पण केले आहे. हे समर्पण विशिष्ट कालावधी पुरते मर्यादित नसून ते कायमचे आहे. आमचे प्रेम जसे देवावर आहे तसेच आम्ही आमच्या मायभूमीवरही अतोनात प्रेम करतो. देशभक्तीशिवाय आम्हाला दुसरे काहीच माहिती नाही. एवढेच नाही तर देशभक्तीशिवाय इतर गोष्टी जाणून घेण्याची आम्हाला गरजही वाटत नाही. संत शुकदास महाराज म्हणतात, ज्याने आपले सर्वस्व ईश्वरचरणी अर्पण केले आहे, तोच खरा देवभक्त आणि तीच खरी देशभक्तही आहे. येथे संत शुकदास महाराज देवभक्ती आणि देशभक्ती यांचा अतिशय सुंदर समन्वय घडवून आणताना दिसतात. राष्ट्रीयत्वाचे प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उमटलेले दिसून येते. हाच आशय ‘अनुभूति’ ग्रंथातील १५७ क्रमांकाच्या अभंगात आढळून येतो. कर्मयोगी संत शुकदास महाराज म्हणतात की,
आमुचा भारत, आम्हा तीर्थासम। येथे अनुपम, सर्व काही।।
आम्हासाठी येथे, सर्वांची शरीरे । आहेत मंदिरे, ईश्वराची।।
शुकदास म्हणे, या मंदिरातील। देवास भजेल, तोचि मुक्त ।।
आमचा भारत देश आम्हास तीर्थासमान आहे. येथे सर्वकाही उपमा रहित आहे. येथे सर्वच सत्यम, शिवम, सुंदरम आहे. आमच्यासाठी येथे सर्वांची शरीरे हीच खर्या अर्थाने ईश्वराची मंदिरे आहेत. संत शुकदास महाराज म्हणतात, या मंदिरातील देवाची जो भक्ती करेल त्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या संस्कृतीत मोक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्याला जर खरोखर मोक्ष मिळावा असे वाटत असेल तर समाजसेवा हा एक उत्तम मार्ग आहे. तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जी पुण्यप्राप्ती होते, तीच पुण्यप्राप्ती देशसेवा केल्याने होते. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून, तीच खरी देशभक्ती आहे. ईश्वर भक्ती आणि समाज सेवा केल्यास मोक्षप्राप्ती होते, असे संत शुकदास महाराज म्हणतात.
निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज आपल्या अभंगातून अध्यात्माचे नाते राष्ट्रीयत्वाशी जोडू पाहतात. संत शुकदास महाराज हे ईश्वर भक्तीबरोबर देशभक्तीचे महत्त्व विशद करतात. अध्यात्मातून राष्ट्रभक्ती ही आधुनिक काळातील संत शुकदास महाराजांच्या विचारातील मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. स्वामी विवेकानंदांचे देशातील युवकांच्या माध्यमातून विवेकशील मार्गांनी रचनात्मक समाजनिर्मिती करण्याचे प्रत्यक्ष कार्य विवेकानंद आश्रम रूपाने हिवरा आश्रमसारख्या ग्रामीण परिसरात सुरू आहे. येथील शैक्षणिक संकुल म्हणजे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणारा युवक घडविणारी कर्मशाळा म्हणून नावारूपास आली आहे. कर्मयोगी संत शुकदास महाराज्यांच्या शिवभावे जीवसेवेतून देशभक्तीचेच दर्शन अधिक प्रखरतेने घडताना दिसून येते.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. (मो.नं ९९२३१६४३९३)