– कृतीशील कार्यक्रम निश्चित करण्याची पवारांची ग्वाही
पुणे (प्रतिनिधी) – वारकर्यांचा वेष धारण करून महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. ही मंडळी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खंत वारकरी शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे व्यक्त करत, वारकरी सांप्रदायाची अडचण पवारांपुढे मांडली. त्यावर वारकर्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे. यासाठी कृतिशील कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, अशा शब्दात पवारांनी वारकरी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. वारकरी सांप्रदायात आरएसएसप्रणित काही कथित बुवा-महाराज घुसखोरी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती.
नवीन पिढी व्यसनाधीनता किंवा अंधश्रद्धेकडे न झुकता संतांचे विचार आचरणात आणेल, यासाठी कृतिशील कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल, अशीही भूमिका वारकर्यांनी शरद पवार यांच्यापुढे याप्रसंगी मांडली. त्यावर पवार म्हणाले, की वारकर्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकली पाहिजे, या मताचा मीदेखील आहे. वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना ज्या समस्या भेडसावत आहेत, किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन काम करावे लागेल. एक चळवळ म्हणून याकडे पाहावे लागेल. वारकरी परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन शिष्टमंडळाला पवार यांनी दिले. पवार म्हणाले ‘संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेली वारकरी परंपरा आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली धारकर्यांची परंपरा. या दोन्ही परंपरा टिकवण्याची जबाबदारी संत परंपरेत काम करणार्या या कीर्तनकारांकडे येऊन ठेपली आहे. मात्र सध्या महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकर्यांचा वेष धारण करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही निश्चितच गंभीर बाब आहे. महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन संतांचे खरे विचार पोहोचवणारे कीर्तनकार हे शेतकरी कुटुंबातून येतात. संताचे विचार टिकावेत, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी त्यांनी काही कल्पना माझ्यासमोर मांडल्या. यासाठी मूल्यशिक्षणामध्ये काही बदल करता येतील का, वारकरी संप्रदायाचे मेळावे किंवा चर्चासत्र भरवता येतील किंवा वारकरी शिक्षण परिषद किंवा वारकरी संशोधन संस्था सुरू करता येईल का, अशा सूचना शिष्टमंडळाने मांडल्या, असेही शरद पवार यांनी या भेटीबद्दल सांगितले.
महाराष्ट्रात संतांच्या विचारांचा वारसा चालवणारे, संताचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजवणारे अनेक कीर्तनकार आणि वारकर्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वारकरी संप्रदायात वेगवेगळ्या शक्तींची घुसखोरी होत असल्याची तक्रार करत, संप्रदायासाठी कृतिशील कार्यक्रम आखावा लागेल, अशी अपेक्षा वारकर्यांनी व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनीदेखील सहमती दर्शविली आहे. महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन संतांचे खरे विचार पोहोचवणारे कीर्तनकार हे शेतकरी कुटुंबातून येतात. संताचे विचार टिकावेत, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे, या प्रयत्नांना बळ देण्याचे काम करण्याची ग्वाही पवारांनी वारकरी सांप्रदायाला दिली आहे.
——————