बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांचे चार्जिंग पॉइंट देण्याच्या नावाखाली ‘इलेक्ट्रो चार्जिंग पॉईंट’ ही बनावट कंपनी तयार करून व बनावट वेबसाईट तयार करून शहरातील पवनकुमार देशमुख यांची दिल्लीच्या ठगांनी तब्बल ६ लाख ८० हजारांची फसवणूक केली आहे. या भामट्यांना बुलढाणा पोलिसांनी दिल्लीत जाऊन जेरबंद केले. सद्या हे भामटे बुलढाणा पोलिसांच्या कोठडीत असून, पोलिस त्यांच्याकडून कसून माहिती काढत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे शोरूम देणे, चार्जिंग पाईंट देण्याच्या नावाखाली अनेक टोळ्या सर्क्रीय झाल्या असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे.
दिल्लीच्या या भामट्यांनी पवन देशमुख (रा. बुलढाणा) यांना इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांचे चार्जिंग पॉइंट देणे, चार्जिंग स्टेशन घेण्यासाठी सरकारी अनुदानाबाबत आणि चार्जिंग पॉइंट घेणार्या उमेदवारास भविष्यात होणार्या फायद्याबाबत प्रलोभन देत, चार्जिंग पॉइंट घेणार्यांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही, फक्त रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे, असे सांगून फसवले व त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने ६ लाख ८० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, देशमुख यांनी बुलढाणा शहर पोलिसांत धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी दिल्लीत जात, दोन जणांना दिल्लीतून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मानव कृष्णकुमार शर्मा व शेखर प्रकाशचंद्र शर्मा (सर्व राहणार विकास नगर, गौतम नगर नांगलोई पश्चिम दिल्ली) या आरोपींचा समावेश आहे. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.
पवन देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २७ जानेवारीरोजीच फसवणुकीसह सायबर क्राईमचा गुन्हा दाखल केलेला होता. चौकशीअंती निष्पन्न झालेल्या आरोपींना बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकांनी दिल्ली येथून अटक करत, न्यायालयासमोर हजर केले असता, दोन्ही संशयित आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठंडी मिळाली आहे, अशी माहिती बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे.
—————–