कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील श्री गोदड महाराजांच्या रथोत्सवामुळे झालेला मोठ्या प्रमाणातील कचरा, शहरात नागरिकांचे महाश्रमदान घेऊन स्वच्छ करत, कर्जत नगर पंचायतीने ‘स्वच्छ कर्जत’ हे आपले बिरुद टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांचा रथोत्सव आषाढ वद्य एकादशी या दिवशी भरत असतो. गेली दोन वर्षे कोरोना मुळे यात्रा भरली नव्हती. त्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात भरली व गर्दीने उच्चांंक गाठला. लाखो लोकांनी स्वच्छ कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा केला होता. या दरम्यान पाऊस आल्यामुळे तो नगर पंचायतला रोजच्या रोज भरता ही आला नाही. त्यामुळे शहराची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शना खाली आज दि 27 जुलै रोजी म्हाश्रमदानाचे आयोजन करत, कर्जत शहर स्वच्छ करण्याचा संकल्प नगर पंचायत कर्जतने जाहीर केला होता. यासाठी शहरातील सर्वच शाळा, सर्व सामाजीक संघटना यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत सकाळी साडे सहा पासून सर्वानी स्वच्छता करत शहराला काही प्रमानात स्वच्छ करण्याचे काम केले गेले.
कर्जत शहरातील नागरिक गेली 662 दिवसा पासून सर्व सामाजिक संघटना म्हणून दररोज सकाळी एक तास श्रमदान करून स्वच्छता करत वृक्षारोपन करत आहेत. या अभीयानातील सर्व श्रमप्रेमीनी सकाळी साडे सहा ते साडे सात तास स्वच्छता केली. त्याचे बरोबर मिरजगाव येथील टायगर अँकेडमीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी श्रमदान केले, मिरजगाव येथून 20 किमी पळत येत या सवाशे मुलांनी कर्जत येथे श्रमदान केले. यानंतर नगर पंचायतचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी, स्वच्छता कामगार, विविध शाळाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, प्राचार्य आदींनी कर्जत शहरातील विविध भागात स्वच्छता करत कर्जत शहराला स्वच्छ करण्यात हातभार लावला. शेवटी कर्जत बस स्थानकावर सर्वानी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत या महाश्रमदानाची सांगता केली. या ठिकाणी मुख्याधिकारी गोविंद जाधव, कर्जत जामखेड एकात्मिक विकासचे अरुण पुरी, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, नगराध्यक्षा उषा राऊत यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या महाश्रमदानात गट विकास अधिकारी अमोल जाधव, नगरसेवक नामदेव राऊत, संतोष म्हेत्रे, प्रतिभाताई भैलूमे, भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल, अभय बोरा, सतीश पाटील, अमृत काळदाते, सुनील शेलार, रवी सुपेकर, लालासाहेब शेळके, रज्जाक झारेकरी आदी सह अनेक जण सहभागी झाले होते.
माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या कर्जत शहरातील नागरिकांनी आपले शहर स्वच्छ सुंदर व हरित होईल यासाठी स्वतः होऊन पुढे यायला हवे . याचा नक्कीच लाभ आपल्या स्वतः ला आपल्या मुलाबाळांना होणार असून यामाध्यमातुन कर्जतचे नाव मोठे होण्यास मदत होणार आहे. याकडे सर्वानी गट तट राजकारण बाजूला ठेऊन पाहिले पाहिजे.