कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज माघारी घेतले गेल्याने तिसर्या आघाडीची शक्यता मावळली असून, १८ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक उमेदवार निवडणूक लढत असून भाजपा व राष्ट्रवादीच्या आमदाराच्या नेतृत्वाखाली दोन पॅनल समोरासमोर उभे राहिले असले तरी काही इतर उमेदवारामुळे ही रंगत वाढणार असल्याचे पहावयास मिळत आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल तर आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल समोरासमोर उभे राहिले आहेत. आ. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मतदार संघासाठी जगताप मंगेश रावसाहेब, पाटील अभय पांडुरंग, तापकीर काकासाहेब लक्ष्मण, शिंदे प्रकाश काकासाहेब, मांडगे रामदास झुंबर, पावणे भरत संभाजी, नवले नंदकुमार मारुती, गांगर्डे विजया कुंडलीक, जामदार लिलावती बळवंत, पाटील नितीन निळकंठ, वतारे लहू रामभाऊ, ग्राम पंचायत मतदार संघातून मोढळे सुरेश मानिक, यादव बळीराम मारुती, लोंढे बाळासाहेब विश्वनाथ, बोरुडे सभाजी रोहिदास, व्यापारी मतदार संघातून भंडारी अनिल शोभाचंद, काळे कल्याण भीमराव, हमाल मापाडी मतदार संघातून नेटके बापूसाहेब प्रभाकर हे उमेदवार जाहीर केले असून आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मतदार संघासाठी पाटील संग्राम साहेबराव, तनपुरे गुलाब रामचंद्र, अनभुले दादासाहेब एकनाथ, घालमे मधुकर बाबुराव, खेतमाळस रमेश बाबुराव, भोसले संतोष बन्यासाहेब, भोसले रामचंद्र दिगांबर, कळसकर सुवर्णा सतिष, थेटे अरुणा जयसिंग, शेवाळे श्रीहर्ष कैलासराव, पावणे विजय शिवराम, ग्रामपंचायत मतदार संघातून कानगुडे राम प्रभाकर, पावणे किरण उत्तम, कांबळे वसंत विठ्ठल, पाटील अमोल शिवाजी व्यापारी/आडते मतदार संघातून भंडारी विजय चंपालाल, नेवसे प्रफुल्ल पंढरीनाथ, तर हमाल मापाडी मतदार संघात काळंगे जालींदर रमेश यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
या दोन प्रमुख पॅनलशिवाय सोसायटी मतदारसंघातून लालासाहेब सुद्रिक, हौसराव गांगर्डे, शरद काळंगे, रमेश व्हरकटे, ग्राम पंचायत मतदार संघातून केतन पांडूळे, पूजा नितीन जगधने, व्यापारी आडते मतदार संघातून रवींद्र कोठारी, किरण सुपेकर, व हमाल मापाडी मतदार संघातून महावीर बाफना यांनी निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनलची स्थापना करत तिसरी आघाडी स्थापन करत असल्याचे कोठारी यांनी जाहीर केले. शेतकरी बचाव पॅनलचे निमंत्रक रवींद्र कोठारी व समन्वयक लालासाहेब सुद्रिक यांनी उर्वरित उमेदवारांना एकत्रित करत आपली मोट बांधून शेतकरी बचाव पॅनलला एकच निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे अर्ज दिला आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचे जिल्हा सहकार बँकेचे संचालक व खा डॉ सुजय विखे समर्थक असलेले अंबादास पिसाळ हे तिसरी आघाडी उभारणार असा जोरदार प्रचार करण्यात आला होता मात्र आ. प्रा. राम शिंदे यांनी दोन दिवस अगोदर लोकसभा लढविण्याचा अचूक बाण मारून पिसाळ यांचे बंड होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली व त्याचा परिणाम म्हणजे बंडखोरी टळली तर आ. रोहित पवार यांनी ही काँग्रेसला काही जागा देऊन आपल्यात ही बंडखोरी होणार नाही याची विशेष काळजी घेतली मात्र ऐन निवडणुकीच्या काळातच पक्षाचे तालुकाध्यक्ष सांभाळण्यात मात्र अपयश आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची शांतता पहावयास मिळाली. राष्ट्रवादीने उशिरा पर्यंत आपल्या उमेदवारांची यादी ही जाहीर केली नव्हती.
किती आटापिटा… पण शेवटी अर्ज काढावा लागला!
कृषी उत्पन्न बाजार समितीत सोसायटी सर्व साधारण मतदार संघात एका उमेदवाराने अर्ज दाखल केला, अर्जाच्या छाननी मध्ये सात बारा उतारा जोडला नाही म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी सुर्यवंशी यांचे कडून हा अर्ज बाद करण्यात आला, याविरुद्ध संबंधित उमेदवाराने जिल्हा निबंधकाकडे अर्ज केला तेथे ही या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, मात्र या पठ्ठ्याने हार मानली नाही, थेट खंडपीठात अपील केले. निवडणुकीचा विषय असल्याने न्यायालयाने ही तातडीने हा अर्ज पटलावर घेत अर्ज मंजूर केला. सदरचा मंजुरीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पर्यत पोहचे पर्यंत अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस उजाडला होता, दुपारी या उमेदवाराचे नाव उमेदवाराच्या यादीत वाढवण्यात आले, मात्र शेवटच्या क्षणी दुपारी ३ वाजता या उमेदवारांला कोणाच्या तरी सुचने वरून आपला अर्ज मागे घ्यावा लागला जर उमेदवारी अर्ज माघारीच घ्यायचा होता, तर एवढा आटापिटा कशासाठी असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व दोन्ही शिवसेना भाजपा बरोबर….
भाजप प्रणित पॅनल मध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी सहकारी सोसायटी मतदार संघाच्या सर्वसाधारण गटातून उमेदवारी केल्याने अनेकांना धक्का बसला. तर उद्धव ठाकरे सेनेचे बळीराम यादव हे पण अपेक्षित असलेल्या ग्राम पंचायत मतदार संघातून भाजपा प्रणित पॅनल मधून निवडणूक लढवत असल्याने आ. शिंदे यांनी महविकास आघाडीला दणका दिला आहे.