ओबीसीचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे फक्त भाजपातच शक्य – हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी
- आ. श्वेताताई महाले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे कल्याणकारी सरकार आणा!
– युवानेते बंडू खरात यांनी काँग्रेस सोडली; भाजपात केला जाहीर प्रवेश!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनतो तर माझ्यासारखा सामान्य घरातील ओबीसी समाजातील व्यक्ती हरियाणा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो; हे फक्त भारतीय जनता पक्षातच शक्य आहे. कारण, या पक्षात उच्चनिचता, जातीभेद कधीही पाळला जात नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधील पानिपत येथूनच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानाचा देशभरात शुभारंभ केला. स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांच्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेरणा घेतली आणि स्त्री शिक्षणासह महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी मोदी सरकार फुलेंच्या विचारानुसार कार्य करत आहे. महाराष्ट्रातसुद्धा महायुती सरकारने माळी समाजासह ओबीसी समाजाकरिता अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. याद्वारे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करत आहे, असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री तथा माळी समाजाचे राष्ट्रीय नेते नायबसिंह सैनी यांनी केले. आ. श्वेताताई महाले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे कल्याणकारी सरकार आणा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
आज, दि. १७ नोव्हेंबररोजी श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला मार्गदर्शन करताना नायबसिंह सैनी हे बोलत होते. महायुतीच्या चिखली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांच्या प्रचारासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी हे चिखली येथे आले होते. रामकृष्ण मौनीबाबा संस्थांमध्ये यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंचावर आ. श्वेताताई महाले यांच्यासह भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, शालिनीताई बुंधे (छत्रपती संभाजीनगर), पीरिपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शहर प्रमुख विलास घोलप, चिखली शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुका अध्यक्ष सुनील पोफळे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शेख अनीस, डॉ. राजेश्वर उबरहंडे, हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, योगेश राजपूत, संजय चेके, भाजपा बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार योगेश शेरेकर, सुरेंद्र पांडे, सुभाषअप्पा झगडे यांच्यासह महायुतीमधील नेते व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
आजपर्यंत साठ वर्षांत काँग्रेसने केवळ खोटी आश्वासने दिली, जनतेची दिशाभूल करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेस दिलेला शब्द कधीच पाळत नाही ते फक्त भ्रष्टाचार करतात, त्यामुळे अशा काँग्रेसच्या साथीने तयार झालेल्या महाविनाश आघाडीचा सुपडा साफ करण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांना मोठ्या मताधिक्क्याने चिखली मतदारसंघातून विजयी करा, व राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे कल्याणकारी सरकार निवडून आणा, असे सांगतानाच ते म्हणाले, की खोटी आश्वासने देऊन जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करायची आणि भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती जमा करायची, असाच कार्यक्रम काँग्रेसने राबवला. आजवरची काँग्रेसची सरकारे ही स्वतःच्या कुटुंबाचे हित पाहणारे होती. परंतु २०१४ पासून देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आल्यानंतर स्वतःच्या कुटुंबाची नव्हे तर देशातील सर्वसामान्य नागरिकांचे हित पाहणारे सरकार काम करू लागल्याचे नायबसिंह सैनी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात गेली अडीच वर्षे महायुतीच्या सरकारने शेतकरी, महिला, युवक, दलित, अल्पसंख्यांक, व्यापारी या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे महायुती सरकारची लोकप्रियता वाढली असून, चिखली मतदारसंघातसुद्धा आ. श्वेताताई महाले यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे; त्यामुळे चिखलीमध्ये श्वेताताई महाले आणि महाराष्ट्रात महायुती सरकार यांना पुन्हा आपली पसंती मताद्वारे द्या, असे आवाहन सैनी यांनी केले.
या सभेप्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना फुले पगडी घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. युवा नेते बंडू खरात यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून सैनी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, शालिनीताई बुंदे व शिवाजीराव देशमुख यांचे यावेळी भाषणे झाली. सभेचे प्रास्ताविक दत्ता खरात यांनी तर गणेश धुंदळे यांनी सूत्रसंचालन केले. चिखली शहर व ग्रामीण भागातील माळी समाज बांधवांसह ओबीसी समाजातील मतदार बंधू भगिनी तसेच भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाचा डीएनए ओबीसीचा – श्वेताताई महाले
चिखली मतदारसंघाच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून राज्यातील महायुती सरकारने ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. याशिवाय, चिखली मतदारसंघात आपण माळी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार केली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार असल्याचे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील माळीबहुल गावांमध्ये विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच महाज्योती अभियानाअंतर्गत ओबीसी समाजातील तरुणांना व्यवसाय आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध उपक्रम सुरू करून त्यांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले. भाजपाचा डीएनएच ओबीसीचा असल्याने ओबीसी समाजाचे मोठे पाठबळ मला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास आ. महाले यांनी व्यक्त केला.
उमेदवाराचा पराभव दिसत असल्यानेच राहुल गांधींची सभा रद्द!
चिखलीमधील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सभा रद्द होण्याचे कारण म्हणजे येथील उमेदवाराचा पराभव निश्चित असल्याची गोपनीय माहिती गांधी यांच्यापर्यंत पोहोचल्याचा दावा आमदार श्वेताताई महाले यांनी केला. राज्यातील महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपयांची मदत मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सोयाबीन उत्पादक शेतकर्यांसाठी ६ हजार रुपये हमीभावाची घोषणा केली आहे. यावरही महायुती सरकारकडून २० टक्क्यांचे अनुदान सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. मागील अडीच वर्षात चिखली मतदारसंघात हजारो कोटी रुपयांच्या विकास निधीमधून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू झाली. त्यामुळे चिखली शहर व ग्रामीण भागाच्या प्रगतीला गती मिळाली. ही गती येणार्या काळात सुद्धा कायम राखण्यासाठी कोणत्याही अफवा आणि भुलथापांना बळी न पडता येत्या २० नोव्हेंबरला माझ्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून यावेळी केले.