सिंदखेडराजातील पारंपरिक लढतीत विजयाचा कौल कुणाला?
- प्रचारतोफा उद्या थंडावणार; प्रचारासाठी रविवार ठरला 'सुपर संडे'!
– अंतिम टप्प्यात, रॅली, पदयात्रा आणि जाहीरनामापत्रके ठरली आकर्षक
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात यावरर्षी पारंपरिक लढती सोबत महायुतीचा आणखी एक भिडू रणांगणात भिडल्याने चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तरीही खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात होत असल्याने तिघांनीही विजयाचा दावा केला आहे. आरोप प्रत्यारोप, जाहीर सभा, जाहीरनामा, घरोघरी पदयात्रा यामुळे मतदारसंघ ढवळून निघाला आहे. उद्या (दि.१८) सायंकाळी प्रचारतोफा थंडावणार असून, आजचा दिवस तर प्रचारासाठी सुपर संडे ठरला होता.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ.राजेंद्र शिंगणे हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी पाचवेळा या मतदार संघात विजय प्राप्त केला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी वाढत गेली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना फुटीनंतर दोन शिवसेना गट तयार झाले आहेत. उबाठा गटाचे पाठबळ डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे डॉ. शशिकांत खेडेकर यांना भाजपची साथ घ्यावी लागत आहे. भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांनी भाजपनेत्या पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा घेतली. एकनाथ शिंदे यांची सभा घेऊन हवा तयार करण्याचा प्रयत्न केला. मागिल निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्या पराभवाची उणीव भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विशेष लक्ष घातले आहे. मागील निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचे लक्ष कमी पडल्याने त्याचा फटका खेडेकर यांना बसला होता. यावेळी काहीही झाले तरी विजय मिळविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे हेही निवडणूक रिंगणात असून, त्यांना प्रत्येक घटकातून पाठींबा मिळत आहे. ओंबीसी नेते छगन भुजबळ यांच्या जाहीर सभेमुळे त्यांच्या प्रचारात रंगत आली आहे. वडिलांच्या निधनानंतर लगेच विधानसभा निवडणूक लागली असल्याने वडिलांच्या कार्याच्या सहानुभूतीची शिदोरी त्यांच्या पाठीशी कितपत यशस्वी होईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा १९९५ साली विजय झाला होता. २०१४ साली निवडणूक सुरु असताना डॉ. शशिकांत खेडेकर यांचे वडील जिल्हा सहकारी बँकेचे संचालक नरसिंहराव खेडेकर यांचे निधन झाले होते. त्या सहानुभूतीचा फायदा डॉ. शशिकांत खेडेकर यांना झाला होता. मागील महिन्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते देवानंद कायंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांच्या कार्याची, आईने केलेल्या राजकीय कार्याची आणि १० वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेल्या कामाची पावती म्हणून मनोज कायंदे रिंगणात आहेत. वडिलांची सहानुभूती त्यांना तारणावर का? याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सविताताई मुंडे यावेळी रिंगणात आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांचा फॅक्टर त्यांना कितपत विजयाच्या जवळ नेऊ शकतो, हे पाहावे लागेल. कारण वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा जायभाये यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. याचा मोठा फटका त्यांना बसू शकतो. वंचित बहूजन आघाडीचे अनेक नेते आजही प्रचारापासून कोसो दूर आहेत. समाजाचे पाठबळ पाहिजे तसे मिळत नाही. अशा अनेक अडचणी त्यांच्या समोर आहेत. अपक्ष म्हणून १३ उमेदवार आहेत. त्यात गायत्री शिंगणे, दत्तात्रय काकडे, रामदास कहाळे, डॉ. सुरेश घुमटकर हेही रिंगणात आहेत. डॉ.राजेंद्र शिंगणे यांना प्रत्येक निवडणुकीत ८० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यांचा ८० हजारांचा आकडा पार करणारा उमेदवार विजयाचा झेंडा फडकाऊ शकतो. यासाठी दोन दिवसांत काय माया चालते, याकडे लक्ष लागले आहे.