– दोन्ही आमदारांकडून न्याय नाही, प्रशासनानेही मूग गिळल्याने संताप
कर्जत (प्रतिनिधी) -दोन आमदारांच्या तालुक्यात बाभूळगाव खालसा येथील आनंदा नवनाथ पुराणे या युवा शेतकर्याने आपल्या शेतातून ऊस बाहेर नेण्यासाठी अतिक्रमण केलेला रस्ता खुला करून मिळावा, यासाठी प्रशासकीय पाठपुरावा करून ही उपयोग होत नसल्याने, लोक प्रतिनिधीकडे चकरा मारून ही न्याय मिळत नसल्याने अखेरीस शेतातील ऊस नेण्यास रस्त्या नसल्याने कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न उपस्थित करत भावनाविवश होऊन, संतप्त भावना व्यक्त करत, व्यवस्थेविरुद्ध चीड व्यक्त करत आपल्या दीड ऐकर शेतातील ऊस पेटवून दिला.
कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील आनंदा नवनाथ पुराणे यांच्या शेतातील ऊस वाहून नेण्यासाठी असलेला रस्ता काही लोकांनी अडवून अतिक्रमण केले आहे. भावकीच्या वादात नकाशावर दिसत असलेला रस्ता खुला करून द्यावा यासाठी आनंदा पुराणे यांनी तहसीलदार यांचे कडे पाठपुरावा केला, सर्कल यांनी तीन वेळा येऊन रस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्या मात्र संबंधित लोक कागदी आदेश नसल्याने अधिकारी पुढे गेले की रस्ता पुन्हा बुजवत होते या त्रासामुळे दीड एकरात उभा असलेला ऊस कारखान्याला घालता आला नाही, आता तो वाळू लागला असून खाजगी व्यावसायीकाला दिला आहे त्यासाठी तोडून शेतात ठेवला असताना शेता पर्यत गाडीच येऊ दिली जात नसल्याने उनाने ऊस वाळू लागला आहे. दोन दिवस असेच गेले तर पुन्हा या उसाला कोणी घेणार नाही म्हणून आज दुपारी आनंदा नवनाथ पुराणे या ३१ वर्षीय शेतकर्याने सोशल मीडियातून चित्रीकरण करत ऊस पेटवून दिला व प्रशासनाने लोक प्रतिनिधीनी लक्ष दिले नाही तर उसा सारखे मला ही पेटवून घ्यावे लागेल असा इशारा दिला आहे. सोशल मीडियातून या शेतकर्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. रोहित पवार, आ. राम शिंदे यांना आवाहन करत शेतकर्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन आनंदा पुराणे यांनी केले आहे.
शेतकरी आनंदा नवनाथ पुराणे यांनी या प्रश्नी सर्व प्रयत्न संपल्यानंतर आपला ऊस पेटवून देण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी
बबन म्हस्के यांना प्रश्न सांगितला त्यांनी समजून सांगत असे करू नका आपण मार्ग काढू असे म्हटले हवे तर आपण पत्रकार आशिष बोरा याचे कडे आपला प्रश्न मांडावा असाही सल्ला ही म्हस्के यांनी दिला, त्यानुसार त्यांनी बोरा यांना फोन लावला व आपली कैफियत मांडली, अत्यंत रडवेल्या स्वरात ते बोलत होते. मी पाच मिनिटात ऊस पेटवून देणार आहे हे सांगत असताना बोरा यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, सर्व बाजूने समजावून सांगत तुम्ही सर्व कागदपत्र मला पाठवा आपण बातमी करू यातून मार्ग निघेल असे म्हटले परंतु निराश झालेली ही व्यक्ती ऐकायला तयार नव्हती, स्वत:चे नुकसान करून प्रश्न मिटणार नाही असे बोरा म्हनाले, आपण ऊस पेटविण्याची घाई करू नका आपल्या प्रश्नासाठी आम्ही पत्रकार तेथे येऊ, बातम्या लिहू, शूटिंग करू, प्रश्न धसास लाऊ असे म्हणत या शेतकर्याला ऊस पेटविण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यास नकार देऊन मी कदरून गेलो आहे. ऊस गेला नाही तर मी लोकांचे पैसे कसे देणार असे म्हणत दुसर्या बाजूला उसाला काडी लावली व बोरा यांच्या प्रयत्नांना अपयश आले. या शेतकर्याने याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकले आहे.
एखाद्या शेतकर्याने प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर तो प्रश्न सोडविण्यासाठी कायदा आहे, किती कालावधीत प्रश्न सुटला पाहिजे याला नियम आहे. सहा महिने पाठपुरावा करून ही जर प्रश्न सुटत नसेल तर या प्रकरणात दप्तर दिरंगाई कायद्यानव्ये चौकशी करून प्रशासनातील योग्य व्यक्ती विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या शेतकर्याने यावेळी व्हिडिओ प्रसारित करत आपली कैफियत लोकापुढे मांडली असून मार्ग निघाला नाही तर थेट आत्महत्या करण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. एखादी व्यक्ती आपला जीव देण्यापर्यंत त्याला किती त्रास होत असेल याचा सर्वांनी विचार करून अशा अडचणीतील शेतकर्या साठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.
ऊस तर जळाला… शेतकरी जळू नये!
शेतकरी प्रशासनाच्या वेळ काढू कारभाराला कंटाळून आपल्या शेतातील ऊस पेटवून देत असला तरी त्याचे प्रश्न सुटले नाहीत तर तो स्वत: च्या जीवाचे ही काहीही करू शकते त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, लोक प्रतिनिधीनी ही आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांच्या समस्या सोडवून त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मदत करावी अन्यथा आज ऊस पेटवलेला शेतकरी उद्या स्वत:ला पेटवून घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे दुर्घटना होण्या पूर्वी योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सर्वच प्रश्न सोशल मीडियामुळे सुटू शकत नाहीत!
सोशल मीडियाचा बोलबाला सर्वत्र पहावयास मिळत असून एखादा प्रश्न सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून सुटला असला तरी सर्वच प्रश्न सुटतील च असे नाही त्यामुळे लोकांनी स्वत:चे नुकसान होईल असे काम करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्या ऐवजी प्रशासनाशी दोन हात करावे लागतील. सोशल मीडिया तील एखादाच व्हिडिओ प्रचलीत होत असतो याचा लोकांनी गांभीर्याने विचार करावा.