शेतात जाणारा वहिवाटेचा रस्ता चर खोदून अडवला; शेतकर्यांचा खरिप हंगाम धोक्यात!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – शेतात जाणारा वहिवाटेचा रस्ता लगतच्या शेतकर्यांनी चर खोदून पाणी सोडून बंद केला आहे. परिणामी, शेतकर्यांना शेतात पेरणीसाठी जाणे मुश्किल झाले आहे. बंद केलेला रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी शेतकर्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चेडेचांदगाव फाटा ते लखमापुरीला जोडणारा हा रस्ता सुमारे एक किलोमीटर डांबरीकरण झाला असून, उर्वरित रस्त्यावरील गट क्रमांक १२४ व १२५ मध्ये शेतकर्यांनी या रस्त्यावर मोठा चर खोदून, पाणी सोडून, रस्त्यावर कट्या टाकून बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील असंख्य शेतकर्यांना सध्या शेतजमिनीत माशगती व खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठीं शेतात जाणे रस्त्याअभावी मुश्किल झाले आहे. तसेच शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताच पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेतकर्यांची मोठी अडचण झाली आहे. बंद केलेला रस्ता तातडीने खुला न झाल्यास संबंधित असंख्य शेतकर्यांची जमीन पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. तातडीने संबंधित शेतकर्यांनी बंद केलेला हा रस्ता तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांनी शेवगावचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर बाळासाहेब घेवारी, भीमराव गंडे, रामभाऊ पाखरे, बंडू पाखरे, भानुदास जर्हाड, अंकुश ठोंबरे, अशोक जर्हाड, सोमनाथ दहिफळे, आदीसह असंख्य शेतकर्यांच्या सह्या आहेत.