राज्य सरकारी कर्मचार्यांना ‘गूड न्यूज’; महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानतंर आज राज्य सरकारनेदेखील शासन निर्णय काढून राज्य सरकारी कर्मचार्यासाठी चार टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाईभत्ता हा ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर गेला आहे. हा वाढीव महागाई भत्ता हा जानेवारीपासूनच्या थकबाकीसह जून २०२३ महिन्याच्या पगारात देण्यात येणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून हा भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज वित्त विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात आलेला आहे. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचार्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या संदर्भात आता राज्य सरकारने निर्णय जाहीर करत महागाई भत्ता वाढवण्याचे जाहीर केले आहे.
यानुसार जाहीर करण्यात आलेल्या निर्णयात म्हटले की, १ जानेवारी २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी २०२३ ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झालेला आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारनेदेखील त्यांच्या कर्मचार्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ केली होती. केंद्राने ३ एप्रिल २०२३ रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता.
————
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202306301832142205.pdf