UPDATE
- मृतदेहांवर होणार सामूहिक अंत्यसंस्कार
मृत झालेल्या प्रवाशांची नावे कळली असली तरी कोणता मृतदेह कुणाचा, हे ओळखणे अवघड झालेले आहे. तिकिट बुकिंग करतांना केवळ नाव आणि मोबाईल नंबर दिल्याने माहिती घेण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ध्याचे तहसीलादर रमेश कोळपे हे एका पथकासोबत बुलढाणा येथे गेले होते. त्यांनी वर्ध्यातील मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन सामूहिक अंत्यसंस्काराची परवानगी घेतली. त्यामुळे सर्व मृतांवर बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. - अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोकं बोलतात तो ‘देवेंद्रवासी’ झाला: शरद पवार
बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. यावेळी शरद पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामात त्रुटी, कमतरता असल्याची शक्यता बोलून दाखवली. समृद्धी महार्गावरील बसच्या अपघाताचे कारण कदाचित याठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन न करणे, हे असावे. त्याचा दुष्परिणाम म्हणून याठिकाणी अपघातांमध्ये लोक मृत्यमुखी पडत आहेत. आमच्या गावात अशी चर्चा आहे की, लोक सांगत होते, याठिकाणी एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली तर लोक असं म्हणतात, या अपघातात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. तो रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना सतत सुरु आहेत. अपघात झाला की, राज्य सरकार मृतांना ५ लाख देते. त्याने हे प्रश्न सुटणार नाहीत. आतापर्यंत जे झालं ते वाईट झालं. यासंदर्भात देशातील रस्ते नियोजनाचे ज्ञान असलेले अत्यंत कर्तबगार लोक असतील त्यांचे एक पथक तयार करावे. त्यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी करुन घ्यावी आणि चूक कुठे झाली आहे, हे शोधून काढावे. अपघातानंतर मृतांना ५ लाखांची मदत जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. - समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एमएच २९ बीई १८१९ या गाडीतील मृत्युमुखी पडलेल्या सर्वच्या सर्व 25 प्रवाशांची ओळख पटली असून, त्यांची नावे अशी आहेत – तेजस पोफळे (चंद्रपूर), तुषार/ करण भुतनवरे (झडशी, सेलू), वृषाली वनकर (चंद्रपूर), शोभा वनकर (चंद्रपूर), ओवी वनकर (चंद्रपूर), इशांत गुप्ता (नागपूर), सृजल सोनोने (यवतमाळ), तनिशा तायडे (वर्धा), तेजू राऊत (अल्लीपूर, वर्धा), वैâलास गंगावणे (पुणे), कांचन गंगावणे (पुणे), सई गंगावणे (पुणे), संजिवनी गोठे (वर्धा), सुशील दिनकर खेलकर (वर्धा), गुडिया शेख (नागपूर), रिया सोनपुरे (नागपूर), कौस्तुभ काळे (नागपूर), राजश्री गांढोळे (वर्धा), मनिषा बहाळे (वाशिम), संजय बहाळे (वाशिम), राधिका खडसे (वर्धा), श्रेया वंजारी (वर्धा), प्रथमेश खाडे (वर्धा), अवंतिका पोहनकर (वर्धा), निखिल पाते (यवतमाळ) या २५ प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश असून, या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झालेला आहे. प्रशासनाने आयुष घाडगे या तरूणाचे नाव मृतांच्या यादीत नमूद केले होते. परंतु, तो जीवंत असल्याचे स्पष्ट झाले असून, या अपघातातील मृतांची संख्या एकूण 25 असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- या अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशी आहेत – चालक शेख दानिश शेख इस्माईल (दारव्हा, जि.यवतमाळ), क्लिनर संदीप मारोती राठोड (वय ३१, रा. तिवसा, अमरावती), योगेश रामराव गवई (रा. छत्रपती संभाजीनगर), साईनाथ धरमसिंग पवार (रा. माहूर, जि. नांदेड), शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा, जि.यवतमाळ), पंकज रमेशचंद्र (रा. कांगडा, हिमाचलप्रदेश). या जखमी प्रवाशांवर देऊळगावराजा येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर मृतदेह बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोंगटे (९३०७५३५२५९) व डॉ. यास्मीन चौधरी (९४२२८६२३३७) किंवा ०७२६२-२४२४२३ यांच्याशी मृतदेहांशी संबंधित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देत, पाहणी केली असून, नंतर रुग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली. या अपघाताची गृहमंत्रालयामार्फत चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, हा अपघात बसचे टायर फुटल्याने झालेला नाही, असा अहवाल अमरावती परिवहन आयुक्तांनी दिला असून, चालकाला डुलकी लागल्याने तो झाला असल्याचा अंदाज आपल्या अहवालात वर्तविला आहे.
समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा हद्दीत काल मध्यरात्री झालेल्या खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी भेट देऊन पाहणी केली. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जाईल, त्यावर उपाययोजना करणार… pic.twitter.com/R3GAVfz2O9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 1, 2023
- या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओने दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातातून ड्रायव्हर वाचला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे व त्याची कसून चौकशी सुरू आहे.
- बस अपघातानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी वेगळीच शंका बोलून दाखवली. ‘भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. वाहक-चालक या अपघातातून बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. यातील चालकावर सिंदखेडराजा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, अटक झाली आहे. टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रथमदर्शनी तरी असे काही झाले असेल असे मला तरी वाटत नाही,’ असे म्हणत गिरीश महाजन यांनी अपघाताबद्दल शंका बोलून दाखवली.
- तर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ‘बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले’. ‘सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
- या अपघातावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक विधान केले आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचं मला वाटतं, असे धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
– भरपावसाने अंदाज चुकला, आधी पोलवर धडकली, मग पलटी झाली, अन अचानक भीषण आग, चालकाविराेधात सिंदखेडराजा पाेलिसांत गुन्हा दाखल
– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळी धाव, जखमींची विचारपूस, मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन, गृह विभागाकडून चाैकशीचे आदेश
लोणार (ऋषी दंदाले/बाळू वानखेडे) – बुलढाण्याच्या इतिहासात आजची शनिवारची पहाट अत्यंत वाईट बातमी घेऊन आली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसला मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगावखुटानजीक भीषण अपघात झाला. तुफान पावसामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने किंवा डुलकी लागल्याने, भरधाव असलेली ही बस आधी लोखंडी पोलवर धडकली, त्यानंतर ती रस्त्यावरच पलटी झाली. त्यात डिझेलची टाकी फुटल्याने किंवा एसीचा स्फोट झाल्याने अचानक बसला भीषण आग लागली. या आगीत हे वृत्तलिहिपर्यंत 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला असून, 6 प्रवासी वाचले आहेत. जखमी प्रवाशांवर उपचार कऱण्यात येऊन त्यांना सुटी देण्यात आली. तर मृतदेह बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते. या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या मुंबई टीमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाला भेट देऊन रूग्णालयात जात जखमींचे सांत्वन केले. या अपघाताची गृहखात्यामार्फत चाैकशी केली जात असल्याचे याप्रसंगी फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, खा. राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, हा अपघात बसचे टायर फुटल्याने नाही तर चालकाला डुलकी लागल्याने झाला असावा, असा अहवाल अमरावती परिवहन आयुक्तांनी दिला आहे. सिंदखेडराजा पाेलिसांनी चालकाला अटक केली असून, त्याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
अपघाताची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलिस अधीक्षक बी बी महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले होते. ही ट्रॅव्हल्स विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत असून, बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. बसमध्ये अनेक अर्धवट जळालेले मृतदेह पाहून बचाव पथकाच्या अंगावर शहारे आले होते. डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. बसचालक दानिश शेख इस्माईल शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत. ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखला किरकोळ दुखापत झाली आहे. सेकंड ड्रायव्हर अरविंद मारुती जाधव अपघातावेळी झोपला होता. दुसऱ्या ड्रायव्हरलाही किरकोळ दुखापत झालेली आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच जखमी आणि मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल क्रमांक – ७०२०४ ३५९५४, ७२६२२ ४२६८३ असे आहेत. या घटनेबद्दल राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात असून, राज्य सरकारवर टीकाही होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अंबादास दानवे यांनी शोक व्यक्त करत, सरकारला खडेबोलही सुनावले आहेत.
समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एमएच २९ बीई १८१९ या गाडीतील मृत्युमुखी पडलेल्या 25 प्रवाशांची ओळख पटली असून, त्यांची नावे अशी आहेत – तेजस पोफळे (चंद्रपूर), तुषार/ करण भुतनवरे (झडशी, सेलू), वृषाली वनकर (चंद्रपूर), शोभा वनकर (चंद्रपूर), ओवी वनकर (चंद्रपूर), इशांत गुप्ता (नागपूर), सृजल सोनोने (यवतमाळ), तनिशा तायडे (वर्धा), तेजू राऊत (अल्लीपूर, वर्धा), वैâलास गंगावणे (पुणे), कांचन गंगावणे (पुणे), सई गंगावणे (पुणे), संजिवनी गोठे (वर्धा), सुशील दिनकर खेलकर (वर्धा), गुडिया शेख (नागपूर), रिया सोनपुरे (नागपूर), कौस्तुभ काळे (नागपूर), राजश्री गांढोळे (वर्धा), मनिषा बहाळे (वाशिम), संजय बहाळे (वाशिम), राधिका खडसे (वर्धा), श्रेया वंजारी (वर्धा), प्रथमेश खाडे (वर्धा), अवंतिका पोहनकर (वर्धा), निखिल पाते (यवतमाळ) या २५ प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश असून, या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झालेला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशी आहेत – चालक शेख दानिश शेख इस्माईल (दारव्हा, जि.यवतमाळ), क्लिनर संदीप मारोती राठोड (वय ३१, रा. तिवसा, अमरावती), योगेश रामराव गवई (रा. छत्रपती संभाजीनगर), साईनाथ धरमसिंग पवार (रा. माहूर, जि. नांदेड), शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा, जि.यवतमाळ), पंकज रमेशचंद्र (रा. कांगडा, हिमाचलप्रदेश). या जखमी प्रवाशांवर देऊळगावराजा येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. तर मृतदेह बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोंगटे (९३०७५३५२५९) व डॉ. यास्मीन चौधरी (९४२२८६२३३७) किंवा ०७२६२-२४२४२३ यांच्याशी मृतदेहांशी संबंधित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; दोन लाखांची मदत जाहीर
या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे.
बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अपघातानंतर सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 6 जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. बस रात्री 1.35 च्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक एका खांबावर जाऊन आदळली. याबाबत ड्रायव्हरला विचारले असता, टायर फुटल्यानं बस जाऊन आदळल्याचे त्याने सांगितले. डिझेल टँकचा स्फोट झाला आणि मोठ्या स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली आणि अचनाक गाडीत आग लागली. तसेच, गाडीचा अपघात झाला, त्यावेळी प्रवासी गाडीत झोपले होते. त्यामुळे गाडीचा अपघात झाला याबाबत अनेकांना कल्पना नव्हती. त्यावेळी जेवढे प्रवासी काचा फोडून बसबाहेर पडले, तेवढे प्रवासी सुखरुप बचावले आहेत. बसमधील सर्वाधिक प्रवासी हे नागपूरचे होते. त्यानंतर बसमध्ये यवतमाळला थांबली होती. त्यामुळे यवतमाळमध्येही काही प्रवासी बसमध्ये चढल्याची माहिती मिळत आहे. अजून कोणते प्रवासी कुठून बसमध्ये चढले याबाबत मात्र योग्य माहिती अद्याप हाती आलेली नाही, अशी माहितीही पोलीस अधीक्षक कडासणे यांनी दिली आहे.
दरम्यान, दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी फडणवीस म्हणाले, की बसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून वाहनचालकाचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले पाटील, आ. संजय रायमुलकर, भाजपचे नेते विजयराज शिंदे, सहकार मंत्री अतुल सावे, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह नेत्यांची उपस्थिती हाेती.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी गर्दी करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्यावर देखील अशीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तपासात अडचणी येत आहे. तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र नागरिकांना बाजूला हटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.
“या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते”, असंही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत. तसेच या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. मी याबाबत पोलिस अधिकाऱ्यांसोबत बोललो आहे. या अपघाताची चौकशी होणार, जखमींवर तातडीच्या उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मृतांची ओळख पटवणे सुरू असून, प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ही बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसचा अपघात पहिल्यांदा बस खांबाला धडकल्यानंतर पलटी झाली आणि आग लागली. ही बस एका बाजूला कोसळली त्यामुळं दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले. त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये नागपूर,वर्धा आणि यवतमाळ मधील प्रवासी होते.
https://twitter.com/i/status/1674965000195301376
काहीच करू शकले नाही!
आपल्यासमोरच बस पेटलेली असताना आणि प्रवासी होरपळून मरत असताना चालक आणि वाचलेले इतर प्रवासीही काहीच करू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रवाशांना वाचवण्याची काहीच साधने नव्हती. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केलं. पण तोपर्यंत संपूर्ण खेळ संपलेला होता. अग्निशमन दलाने तात्काळ ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर बसमधून मृतदेह बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. बसचा अक्षरश: जळून कोळसा झाला आहे. बसच्या सर्वच सीट जळून खाक झाल्या आहेत. प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याने काहीच उरलेले नाही. घटनास्थळी फक्त कोळसा आणि कोळसाच उरला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना कळवले जात आहे.
#WATCH | Buldhana SP Sunil Kadasane, says "The bus was travelling from Nagpur to Pune when at around 1:35 am when it met with an accident on Samruddhi Mahamarg expressway, after which the diesel tank of the bus caught fire. Around 8 people could save their lives. Around 33… pic.twitter.com/a5Uu7EfqR4
— ANI (@ANI) July 1, 2023
नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला जाणारे दोन बस प्रवासी बचावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यानंतर बसचा प्रवास सुरु झाला होता. अर्ध्यातासानंतर पुलाच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर लगेच आग लागली. बसमध्ये आम्ही खाली पडलो त्यामुळं अपघात झाल्याचं समजलं. आमच्यासोबत एक प्रवासी होता त्यानं खिडकीची काच फोडली आणि आम्ही खिडकीच्या बाहेर निघालो.. खाली उडी मारुन बाजूला पळालो, असं अपघातात बचावलेल्या तरुणानं हर्षल हिवसे या तरुणानं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. हा अपघात रात्री १.२६ मिनिटांनी झाल्याची माहिती आहे. बसला अपघात झाल्यानंतर तात्काळ आग लागली. त्याच्यानंतर बसचे टायर फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, अशी माहिती बचावलेल्या प्रवाशांनी दिली. यानंतर आग लागली. अपघातानंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशामन दल तातडीनं दाखल झालं होतं, असं अपघातातून वाचल्याची माहिती समोर आली आहे.