हा अपघात नाही, घात; अन तो मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केला?
– सोयीसुविधांशिवाय महामार्ग चालू का केला?, तुपकरांचा खडा सवाल!
बुलढाणा/छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी पुरेसा सुरक्षित नसतानाही केवळ श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडिया इव्हेंट करत हा मार्ग सुरू केला. २६ प्रवाशांचा होरपळून जीव जाणे हा अपघात नसून, घात आहे आणि तो मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केला आहे. या महामार्गावर सोयीसुविधा नसताना तो चालू करण्याची घाई का केली, असे सवाल छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी करत, शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. रविकांत तुपकर यांनी अपघातग्रस्त रूग्णांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. त्यानंतर, त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकांवर बोट ठेवून टीका केली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत, त्यांचे वाभाडे काढले. ते म्हणाले, की ‘मी याला अपघात म्हणणार नाही, हा घात आहे; आणि हा घात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. आज ते फक्त पाच लाख रुपये देणार असल्याची घोषणा करण्यासाठी गेले आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी मीडिया इव्हेंट करून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले’ असा आरोपही खासदार इम्तियाज जलील यांनी केला. ‘हे तर दोघंही खूप ज्ञानी आहेत. थारमध्ये बसा, मीडियाला सोबत घेऊन इव्हेंट करा. कुठलाही एक्स्प्रेस किंवा सुपर एक्स्प्रेस वे तयार होतो, रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचे क्लिअरन्स मिळाले आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? मी फक्त याच अपघाताबद्दल बोलत नाही. फडणवीस गाडी चालवत होते, शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते, हा जो मीडिया इव्हेंट त्यांनी केला. त्यांना काळजी होती, की आपली सत्ता गेली, तर दुसरं कोणीतरी येऊन उद्घाटन करेल, म्हणून घाईघाईत केले. त्याचे हे परिणाम आहेत. मी याला अपघात नाही म्हणणार, या हत्या आहेत. त्याला जबाबदार आहेत महाराष्ट्राचे हे दोन नेते, जे आज पुन्हा पाच लाख रुपयांची घोषणा करण्यासाठी आले आहेत, असा गंभीर आरोपही खा. जलील यांनी केला आहे.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन गृहातील मृतदेह बघून मन विचलित झाले.… pic.twitter.com/e7JartM4o6
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) July 1, 2023
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जखमींची व बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांची भेट घेत, त्यांना धीर दिला. या घटनेचे आम्ही राजकारण करू इच्छित नाही पण समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात का होतात, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. या महामार्गावर सोयीसुविधा उभारण्यासाठीचे टेंडर-वर्क ऑर्डर का रखडली? सोयीसुविधां शिवाय महामार्ग चालू करण्याची घाई का केली? ५ लाखाची मदत देवून गेलेला जीव परत येणार आहे का? समृद्धी महामार्गावर डांबरचा लेअर व काही विशिष्ट अंतरावर सर्व सोयीसुविधा (रेस्ट रूम, वॉशरूम, हॉटेल, गॅरेज, पेट्रोल पंप) उभारण्याची गरज असताना ते न करता हा महामार्ग सुरू करण्याची घाई का झाली? महामार्गाच्या सुरक्षा निकषांची पूर्तता न करता हा महामार्ग चालू करण्याची घाई झाल्यानेच मोठ्या प्रमाणात माणसे या महामार्गावर बळी गेली आहेत, असा आरोपही रविकांत तुपकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर करून या सरकारला धारेवर धरले.
अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोकं बोलतात तो ‘देवेंद्रवासी’ झाला: शरद पवार
बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. यावेळी शरद पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामात त्रुटी, कमतरता असल्याची शक्यता बोलून दाखवली. समृद्धी महार्गावरील बसच्या अपघाताचे कारण कदाचित याठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन न करणे, हे असावे. त्याचा दुष्परिणाम म्हणून याठिकाणी अपघातांमध्ये लोक मृत्यमुखी पडत आहेत. आमच्या गावात अशी चर्चा आहे की, लोक सांगत होते, याठिकाणी एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली तर लोक असं म्हणतात, या अपघातात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. तो रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना सतत सुरु आहेत. अपघात झाला की, राज्य सरकार मृतांना ५ लाख देते. त्याने हे प्रश्न सुटणार नाहीत. आतापर्यंत जे झालं ते वाईट झालं. यासंदर्भात देशातील रस्ते नियोजनाचे ज्ञान असलेले अत्यंत कर्तबगार लोक असतील त्यांचे एक पथक तयार करावे. त्यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी करुन घ्यावी आणि चूक कुठे झाली आहे, हे शोधून काढावे. अपघातानंतर मृतांना ५ लाखांची मदत जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले.