Head linesVidharbhaWARDHA

सिंदखेडराजाजवळच्या ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांत वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवाशांचा समावेश

अपडेट

मृतदेहांवर होणार सामूहिक अंत्यसंस्कार

मृत झालेल्या प्रवाशांची नावे कळली असली तरी कोणता मृतदेह कुणाचा, हे ओळखणे अवघड झालेले आहे. तिकिट बुकिंग करतांना केवळ नाव आणि मोबाईल नंबर दिल्याने माहिती घेण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ध्याचे तहसीलादर रमेश कोळपे हे एका पथकासोबत बुलढाणा येथे गेले होते. त्यांनी वर्ध्यातील मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन सामूहिक अंत्यसंस्काराची परवानगी घेतली. त्यामुळे सर्व मृतांवर बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


वर्धा (प्रकाश कथले) – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ आज पहाटे दीड ते दोन वाजता झालेल्या ट्रॅव्हल्सच्या अपघातात जिल्ह्यातील १४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. वर्ध्यातून पुण्याकडे जायला १५ प्रवासी निघाले होते. त्यातील एक प्रवासी जखमी झाला असून, उर्वरितांची अद्याप ओळख पटलेली नाही. डीएनए चाचणीनंतरच मृतदेहांची ओळख पटणार आहे. पण या ट्रॅव्हल्सने प्रवासाला निघालेल्यांचे नातेवाईक त्यांच्या कुटुंब सदस्यांची माहिती घेण्याकरीता धावपळ करीत आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन तत्परता दाखवीत नागरिकांना तातडीने माहिती मिळावी, याकरीता प्रयत्न करीत आहे.

आज सकाळी अपघाताची माहिती कळताच जिल्हा प्रशासनाची एक चमू सकाळी ८ वाजताच घटनास्थळी पोहोचली. तर तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह पोलिसांचे एक पथक बुलढाणा येथे दाखल झाले आहेत. मृतांची ओळख पटविण्याकरीता फॉरेन्सिक डिपार्टमेंटची मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ.पंकज भोयर हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांनी संबंधितांसोबत संपर्क साधण्याबाबतची माहिती घेतली. गटविकास अधिकारी तसेच तहसीलदारांना अपघातस्थऴी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. अपघातात दगावलेल्यांची नावे अद्यापही अधिकृतपणे जाहीर केली जात नाही. त्यामुळे सगळीच अनिश्चितता आहे.डीएनए चाचणीशिवाय दगावलेल्यांची नावे जाहीर केली जाणार नाही, असे सांगितले जात आहे.
वर्ध्यातून प्रवासाला निघालेल्यांपैकी वर्ध्याच्या अवंंती पोहणकर, अल्लीपूरच्या संजीवनी गोटे, वर्ध्याचे प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृषाली वनकर, ओवी वनकर, शोभा वनकर यांचा मृत्यू झाल्याचे बुलढाणा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने दुपारी पाच वाजता अधिकृतपणे जाहीर केले. नागपूर येथून विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून पुण्याला जाण्याकरीता काल साडेपाच वाजता निघाली होती. ती ट्रॅव्हल्स वर्ध्यातून १५ प्रवाशांना घेऊन साडेसात वाजताच्या दरम्यान य़वतमाळकडे निघाली. त्यात वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेले १४ प्रवासी होते. वर्ध्यातून अवंतिका पोहणीकर, प्रथमेश खोडे, स्वागत कॉलनीतील श्रेया वंजारी, साईनगरातील राधिका खडसे, कृष्णनगरातील तेजस पोकळे, पूलपैâलातील तनिष्का तायडे, कृष्णनगरातील शोभा वनकर, वृषाली वनकर, ओवी वनकर, तेजू राऊत, पवनार येथील सुशील दिनकर खेलकर, सेलू तालुक्यातील करण बुधबावरे, आर्वीच्या राजश्री गांडोळे, अल्लीपूर येथील कॉम्प्युटर इंजिनिअर संजीवनी गोठे हे पुण्याकडे जाण्याच्या प्रवासाला ट्रॅव्हल्समध्ये बसले होते. हे अपघातग्रस्त झाले. याशिवाय, वर्ध्यातून याच ट्रॅव्हल्समध्ये हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी पंकज रमेशचंद्र हे प्रवासाला निघाले होते. ते जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वर्ध्याच्या कृष्णनगरातील तेजस पोकळे हा पुण्यात मिळालेल्या नोकरीवर रुजू होण्यास पुण्याला जात होता. त्याला दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. औरंगाबाद येथे त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळाली होती. याकरीताच पुण्याला जात असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला.
ट्रॅव्हल्स वर्ध्यातून निघाल्यानंतर ती यवतमाळ येथे रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान पोहोचली. येथून तीन प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये बसले. रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान कारंजा लाड शहराजवळील ढाब्यावर जेवण घेतल्यानंतर ती पुढील प्रवासाला निघाली. यातच ती रस्ता दुभाजकासह खांबावर धडकून उलटली. त्यात ट्रॅव्हल्सने पेट घेतला. यात ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक शेख दानिश शेख इस्माईल रा.दारव्हा जि.यवतमाळ,स्वच्छकाचे काम करणारा तिवसा येथील रहिवासी संदीप मारुती राठोड (वय ३१), औरंगाबादचा योगेश रामराव गवई, माहूरचा साईनाथ धरमसिंग पवार (वय १९), पांढरकवडा येथील शशिकांत रामकृष्ण गजभिये तसेच आणखी दोघे बचावले आहेत. वर्ध्यातून नातेवाईकांना बुलढाणाच्या सिव्हील हॉस्पिटलला जाण्याकरीता जिल्हा प्रशासनाने वाहनांची व्यवस्था करून ठेवली आहे. वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांचे मोबाईल क्रमांक, त्यांचा पत्ता, त्यांच्या नातेवाईकांसोबत जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला आहे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याकरीता जिल्हा प्रशासनाची तसेच पोलिसांची यंत्रणा सज्ज आहे. त्यांना मदत दिली जात आहे. माहिती पोहोचविली जात आहे.

जिल्हा प्रशासनाची तत्परता
अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती समोर येताच जिल्हा प्रशासनाने या ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती मिळावी, याकरीता जिल्हा नियंत्रण कक्षात ०७१५२-२४३४४६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे ८८८८२३९९०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.


ती ट्रॅव्हल्स की जीवंत माणसांना मृत्यूकडे नेणारी शवपेटी?

एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स ही जाrवंत माणसांना मृत्यूच्या दाराकडे घेऊन निघालेली शवपेटीच ठरली. जे बचावले ते भाग्यवान. पण ज्यांच्या कुटुंबातील दगावले, त्यांच्यावरील या संकटाची कल्पनाही करवत नाही. यातून ट्रॅव्हल्सचालकाची दक्षता, ट्रॅव्हल्सचा फिटनेस, अशा विविध बाबी समोर येत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!