देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – लक्झरी बसच्या भीषण अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आयुष घाडगे हा काच मोडून बाहेर पडल्याने वाचला. त्याच्यावर देऊळगावराजा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या रुग्णालयात भेट दिल्यानंतर आयुषला सुटी देण्यात आली. परंतु त्याची कोणतीच व्यवस्था न करता, प्रशासनाने त्याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने तो हताश झाला, ही बाब शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या लक्षात येताच, त्यांची या तरुणांची सर्व व्यवस्था करुन देत माणुसकी धर्म निभावला.
आयुष घाडगे हा अपघातग्रस्त बसमध्ये होता तर त्याचे तीन मित्र पाठीमागून येणार्या दुसर्या लक्झरी बसमध्ये होते. अपघात घडताच एक काच फोडून आयुष व इतर दोघे बसमधून बाहेर निघण्यास यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले. पाठीमागुन आलेल्या बसमधून आयुषचे तीन मित्रही अपघातस्थळीच उतरले व मदत कार्यालयात सहभागी झाले. या अपघातात आयुषची बॅग, कागदपत्रे, पैसे असे सर्वच साहित्य जळाले होते उर्वरीत तीन मित्रांकडेही पैसे नव्हते. आयुष घाडगे याच्यावर देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची पाहणी करुन ते निघून गेल्यानंतर आयुष घाडगे याला सुटी देण्यात आली. परंतु आयुषजवळ काहीच पैसे नव्हते, अर्धवट जळालेले आणि फाटलेले कपडे बदलायचीही सोय नव्हती. त्याने प्रशासनाकडे ‘आमची व्यवस्था काय’ अशी विचारणा केली व जाण्याची व्यवस्था केली नाही. परंतु प्रशासनाने त्याला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, रविकांत तुपकर रुग्णालयात जखमींची विचारपूस करीत असतांना त्यांनी आयुष घाडगे याचीही विचारपूस केली असता, त्यांना आयुषची आपबीती कळताच त्यांनी आयुष आणि त्याच्या तीन मित्र धनंजय खाडे, अनिकेत दंदाडे, प्रतील मालेकर यांना जेऊ घातले आणि त्यानंतर त्यांना तुपकरांनी स्वखर्चाने भाड्याची गाडी करुन दिली व यवतमाळ जिल्ह्यातील वणीकडे रवाना केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे रुग्णालयातून निघून जाताच प्रशासनाने आयुषला सुटी देत वार्यावर सोडले होते. परंतु रविकांत तुपकर यांनी माणूसकी धर्म पाळत त्यांची मदत केली. कोरडी विचारपूस न करता थेट कृतीयुक्त मदत तुपकरांनी केल्याचे दिसून आले.
जीवंत तरुणाचे नाव मृतांच्या यादीत!
दुसरीकडे, आयुष गाडगे जिवंत असतांनाही त्याचे नाव मृतांच्या यादीत सामाविष्ठ करण्यात आले होते. रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्री.तुम्मोड यांच्याशी संपर्क करुन आयुष जीवंत असून, माझ्यासोबत आहे, त्याला देऊळगावराजा रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, त्याला घरी पोहचविण्याची मी व्यवस्था केल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी तुम्मोड यांना सागितल्यानंतर आयुषचे नाव मृताच्या यादीतून कमी करण्यात आले.