सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरंच कौतुकास पात्र आहे. मात्र विद्यार्थ्यांनी यावरच न थांबता मोठी स्वप्न बघावी आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी पालकांनी आपल्या खांद्यावर घेऊन त्या विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघाच्यावतीने इयत्ता दहावी, बारावी आणि इतर विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे उपस्थित होते.
यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कोषाध्यक्ष आर. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे म्हणाल्या, सध्या स्पर्धेचे युग आहे. कोणतेही यश मिळायचे असेल तर खूप कष्ट आणि मेहनत करावी लागते, त्यामुळे मुलांनी मोठी स्वप्न बघावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष भाषणात उबाळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश खरच कौतुकास आहे. स्पर्धेच्या युगामध्ये आर्थिक बाजू भक्कम नाही अशा शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलांचे भवितव्य घडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर इयत्ता दहावी बारावी नीट आणि बारावी कला व कॉमर्समध्ये विशेष प्राविण्य मिळवणार्या दोनशे विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मराठा सेवा संघाच्यावतीने गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत पवार, प्रवीण थोरात, सुजय वाघचवरे, डॉ एस एम चव्हाण, दीपक शेळके, परशुराम पवार, राम माने, एम एन पवार, प्रा आर एस चव्हाण, प्रा जे के रोमन, रमेश जाधव, गोवरधन गुंड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले आभार डॉ उमेश मूगले यांनी मानले.