Uncategorized

‘सावळे परब्रम्ह’!

‘विठ्ठल’ किंवा ‘पांडूरंग’ या नामाने महाराष्ट्राच्या मनीमुखी वसणारी, विलसणारी देवता ही महाराष्ट्रात कुणालाही अपरिचित नाही. मुळात विठ्ठल हा साक्षात् श्रीविष्णूंचा अवतार. भागवत धर्माचं हे प्रमुख दैवत. खरंतर विठ्ठलाच्या विठ्ठलरुपात, त्याच्या तेजस्वी श्यामलतेमधे दडलंय, अलौकिकाचं गाढ रहस्य! पण तरीही, त्याचं रुप कुणालाही भिववून टाकणारं नाही. अजिबात नाही. ते रुप इथल्या माणसांसाठी प्राणप्रिय आहे. तोच विठ्ठल त्यांची माय आहे. बापही तोच. आणि एवढीच दोन नाती नाही बरं! म्हणाल त्या नात्यात वारकरी पाहतो विठ्ठलाला, भेटतो, अनुभवतोही! कारण प्रत्येकासाठी तो विठ्ठल हा ‘त्यांचा विठ्ठल’ आहे. इतकी सलगी आहे प्रत्येकाची त्या परब्रम्हाच्या सावळ्या रुपाशी. आणि त्यांचा विठ्ठलही इतका भोळा, इतका सदय कनवाळू, की त्यानेही मोकळी केलियेत त्याची दारं. सर्वांगाने, अगदी अखंडपणे. त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला न कसला मज्जाव न कुणी मध्यस्थ!

याचवरुन लक्षात येते पांडूरंगाची लोकमयता. खरंतर हा देव आहे, तो माणसासारखा वावरताना, व्यवसाय-कामात गुंतलेला, संसारात रमलेला, येताजाता भेटणारा कुणी पुरुष नाही. पण तरीही त्याचं हे लोकरंगात मिसळून असणं हे अन्य देवतांसाठीही हेव्याचं असावं! असं अनेकदा गंमतीत वाटून जातं. पण पांडूरंगाच्या या लोकमयतेचं गम्य हे त्याच्या रुपापासूनच तर सुरु होतं! महाराष्ट्राचं लोकदैवत म्हणजे विठोबा असं आपण साभिमान म्हणतो. पण या (तेव्हाच्या) महाराष्ट्राचा अगदी ढोबळ पण सर्वांग अभ्यास करता असं लक्षात येतं की इथलं जीवन हे शेतीशी जास्त बांधलेलं आहे. शेतीशी म्हणजे मातीशी. त्या मातीचा रंग काळा. इतकंच नव्हे तर ज्यावर कृषीकार्य नितांत अवलंबून असतं त्या पावसाचा विचार करता कळतं, की तो जिथून येतो ते कृष्णमेघ! तेही काळे. हा राकट महाराष्ट्रदेश दगडांचा. दगडही काळेच. विनोबांनी तर असंही म्हणून ठेवलंय की इथली माणसं सावळी म्हणून त्यांचा देवही सावळा! किती परिंनी आणि किती दिशांनी विचार करावा आपण, किती तर्कांनी नवे अन्वय लावावेत, आपण शेवटी येऊन थांबतो ते त्याच काळेसावळेपणापाशी. अलौकिकाच्या निळाईपाशी. विठ्ठलापाशी! अशा कित्तीतरी प्रवाहांतून, नात्यांतून, अंशांतून इथला माणूस जोडला गेलाय विठ्ठलाशी. म्हणूनच तर तो आपला आहे, अगदी आपलासा. आपल्यासाठी असलेला. फक्त आपल्यासाठी! तो अपाल्यासाठी आहे, हाच किती मोठा आश्वासक श्वास म्हणावा! आणि तोही उभा आहे! बसलेलाही नाही. आपल्या भक्तांच्या काजा धावून जायचंय त्याला, क्षणाचाही विलंब न करता त्याला मदत करायचीय आपल्या लेकरांना. म्हणून तो उभा आहे. तेही विटेवर. आणि तेही कधीपासून? अठ्ठावीस युगांपासून! इथे काही घटकाही उभं राहून आपण शिणतो, पण त्याचा संकल्प मात्र अठ्ठावीस युगांचा! त्याच्याच सारखा, नाही का? हे इतकं सारं निर्हेतुकपणे करणारी आईच तर असते! आणि ही तर अवघ्या जगताची आई! नामदेव महाराज तर आपल्या एका अभंगात सहज म्हणतात, की ही विठूमाऊली आपल्यासाठी उभी आहे ती किती युगांपासून? तर ‘अ ठावीस’. अठ्ठावीस नव्हे, तर अ ठावीस!! किती युगं हे आपल्याला निश्चित माहितही नाहीत. कित्तीतरी युगं लोटली, गणनाही क्षिण झाली पण तो मात्र उभा आहे! आपल्यासाठी. या त्याच्या आपलेपणाची सखोल जाणीव वारकर्याच्या मनात आपल्याला जागजागी दिसते. त्या ममत्वानेच तर एखादी अनक्षर स्त्री म्हणते –

‘इटेवरी उभा
युगं झाल्याती अठ्ठाईस
का रं माझ्या इठ्ठलाला
कुणी म्हणं ना खाली बैस?’

या प्रश्नात सबाह्य भरुन असणारा त्या कुणा अनाम स्त्रिचा आंतरिक ओलावा किती रम्य वाटतो! असंच ममत्व जोडलं गेलंय वारकर्याच्या मनामनात. कारण विठ्ठल असेल जगत्पालक, अगदीच, पण त्यापूर्वी तो त्यांचा मायबाप आहे हे निश्चित. पण का बरं जडलं असेल हे इतकं लोभस नातं? काय बरं गम्य असेल या इतक्या सुकुमार तरल नात्याचं? काय मागत असेल पांडूरंग या नात्याखातर? जेव्हा एकदुसर्याकडून मागणं संपतं, तेव्हाच तर उजळून जातो नात्याचा बंध! तसंच त्याचं मागणं, प्रेमाचं.. फक्त प्रेमाचंच! म्हणूनच तर जन्मवेळेच्या अंधारापासून ते मृत्यूनंतरच्या कुण्या अनाम रंगापर्यंत, सगळ्याच प्रकाश-अंधारांना व्यापून उरलाय हा पांडूरंग! तोही इथल्या माणसांसारखाच साधा. त्याचं मागणं बाकी काहीच नाही. म्हणूनच तर बहिणाबाई लिहितात, –

‘सोन्यानाण्यानं सजला, मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा विठोबा, पानाफुलांतच राजी!’

किती साध्या सोप्या शब्दांत पण मर्माला अचूक स्पर्श करत सांगितलीये परब्रम्हाची निस्पृहता! तो राजी आहे फक्त पानाफुलांतही. कारण ती पानं आर्द आहेत उत्कट अशा भक्तीभावाने. फुलांनाही गंध आहे तो विठ्ठलाप्रतिच्या ममत्वाचा. असे असताना कोणत्या सोन्याला सर येणार आहे या मोहक दागिन्यांची? मोहकच. जसे ते पानाफुलाचे दागिने तसा तोही! त्याच्या रुपाचं स्वरुपाला भिडणारं सावळं गारुड न कळूनही किती मोहक वाटतं! त्या सावळ्या रुपाची मोहिनी इतकी अलौकिक, की खुद्द शंकराचार्यांनाही त्याचं रुप पाहून पांडुरंगाष्टक लिहायचा मोह आवरला नाही! अतिशय आश्वासक, शाश्वत सुखाची अनुभूती देणारं आणि भवसागर इथपोतच आहे! हे सांगत कैवल्यरसाची अमाप बरसात करणारं हे पांडूरंग रुप म्हणजे परब्रम्हाचं लिंग आहे असं आचार्य सांगतात. ‘परब्रम्हलिंगं भजे पांडूरंगम’ . अशा या सावळ्या परब्रम्हाचं रुप हे पूर्णपणे कळणारं, जाणिवेत अचूक पकडता येणारं नाहीच, पण त्याची श्यामलता मात्र उभ्या जन्माला, नव्हे जन्मांना सप्रेम कवेत घेणारी आहे. अशी ही पांडूरंगाची लोकमयता
आषाढी एकादशीला सर्व भक्त, वारकरी यांचा मेळा विठू माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो……विविध ठिकाणाहून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पालख्या निघतात…हजारो, लाखो वारकरी पदयात्रा करत माऊलीचा गजर करत या वारीत सामील होतात.

काय असते ही वारी
कसली ओढ असते
कसली भक्ति असते
कसली आस असते
कसलं प्रेम असत हे
कोणतं समर्पण असतं
माऊलीच्या चरणी लीन होण्याचं
वारी काय फक्त देहाची असते
देहाने करायची असते.
वारी मनाची असते.
वारी म्हणजे येरझारा
वारी म्हणजे सातत्य
वारी म्हणजे नियम
वारी म्हणजे मोक्षा करिता केलेला प्रवास
जन्म मरणाच्या फेर्‍यातून सुटका म्हणजे वारी
माऊलीच्या चरणी
सर्वस्व अर्पण म्हणजे वारी
राग, लोभ मोह मद ,मत्सर,निंदा
या रीपुतून सतत फिरणारं
आपल मन स्थिर, शांत करण्याकरिता
करतो ती वारी……वारी हे व्रत आहे,
ते सातत्याने करायचे असते
गळ्यात माळ घातली की तो वारकरी होतो….
आपल्या देवीच्या आरती मध्ये देखील
‘ वारी वारी आता संकट निवारी’ असे म्हटले आहे.
अशी ही माऊली ची वारी,……..
देहाने जरी करता आली नाही,
तरी मनाने करूया,
माऊलीचे भजन,स्मरण करून ,
सर्व संकट निवारण करून
पुन्हा एकदा हरी नामाच्या जयघोषात
वारी करण्याची प्रार्थना करूया……..
जय हरी विठ्ठल……राम कृष्ण हरी ..

(लेखिका या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे कार्यरत आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!