– अलंकापुरी, देहूत वारकर्यांची मांदियाळी!
आळंदी (अर्जुन मेदनकर) – आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, रविवारी (११ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा जमला आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. दुसरीकडे, जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून पंढरीकडे प्रस्थान ठेवले असून, पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता. यावर्षीचा हा ३३८ वा पालखी सोहळा आहे. पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. यासाठी देहूमध्ये मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यांतून भाविक अलंकापुरीत दाखल झालेले आहेत. इंद्रायणीचा घाट, विविध धर्मशाळा, सिद्धबेट, मंदिरे ही ठिकाणे गर्दीने व्यापली आहेत. दिव्यांच्या प्रकाशझोतामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगली आहे. नदी घाटावर ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू आहेत. सर्वत्र हरिनामाचा अखंड गजर होत आहे.
—-
असा असेल सोहळा कार्यक्रम
– सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श
– सकाळी नऊ ते अकरा दरम्यान मंदिराच्या विना मंडपात कीर्तन होईल
– दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील गाभार्याची स्वच्छता होईल त्यानंतर समाधीस पाणी घालणे आणि महानैवेद्य दाखवण्यात येईल
– दुपारी साडेबारा ते एक दरम्यान भाविकांना समाधीचे दर्शन हे सुरूच राहील.
– दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत मानाच्या ४७ दिंड्यांना मंदिर प परिसरात प्रवेश दिला जाईल याच दरम्यान संजीवन समाधी मंदिरात श्रींचा पोशाख देखील केला जाईल.
– सायंकाळी चार नंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तो खालील प्रमाणे असेल तसेच श्री गुरु हैबतबाबा यांचेतर्पेâ आरती होईल. त्यानंतर संस्थानातर्पेâ श्रींची आरती होईल. त्यानंतर प्रमुख मानकर्यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल . त्यानंतर वीणा मंडपात असणार्या पालखीमध्ये श्रींच्या चलपादुकांना प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
————–