– दोन तास रस्तारोकोनंतर कामाला झाली सुरूवात!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील सातगाव भुसारी – हातणी ते संभाजीनगर या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल परिसरात तीव्र संतापाची लाट असून, गेल्या चार वर्षांपासून हे काम रखडलेले आहे. परंतु, दिलेल्या इशार्याप्रमाणे परिसरातील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सुरू करताच, संबंधित रस्त्याच्या कामाला ठेकेदाराने सुरूवात केली आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.
सविस्तर असे, की सातगाव भुसारी येथे हातणी ते संभाजीनगर या रोडचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडलेले आहे. विशेषतः सातगाव भुसारी गावामध्ये दलित वस्तीला लागून रोडचे काम अपूर्ण असून, येणार्या जाणार्या गाड्यांमुळे धूळ उडत होती, आणि लोकांच्या घरामध्ये धुळीचे थर साचले जात होते. त्या धुळीमुळे लोकांची प्रकृती धोक्यात आली होती. अक्षरशः लोकांच्या जेवणामध्ये धूळ जात होती. म्हणून या रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निवेदन जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तहसीलदार चिखली, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना ग्रामस्थांनी दिले होते. त्यानुसार, १५ दिवसांत या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर १० जूनरोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
त्यानुसार, आज १० जूनरोजी ग्रामपंचात व सर्व गावकरी यांच्यावतीने सकाळी आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक थांबली होती. या आंदोलनाची संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन दोन तासांमध्ये तीन वर्षापासून रखडलेले काम चालू केले आहे. या आंदोलनासाठी सरपंच वनिताताई देशमुख, उपसरपंच राजू मोरे, सदस्य भारत घाडगे, संतोष थोरात, संगीताताई कंकाळ, मीनाताई जाधव, मंदाताई जाधव, प्रयागबई इंगळे, वर्षा बर्डे, मनोज जाधव व तसेच प्रदीप खंडारे माजी सरपंच, गावातील महिला व पुरुष हजर होते.