लहरों को साहिल की दरकार नहीं होती।
हौसला बुलंद हो तो कोई दिवार नहीं होती।
जलते हुए चिराग ने आँधियों से ये कहा।
उजाला देने वालों की कभी हार नहीं होती।
खर तर या काव्याच्या ओळी खर्याअर्थाने जीवनात अंगिकारून यश प्राप्त केले असेल तर ते म्हणजे चतुरस्त्र संपादक व उद्योजक पुरूषोत्तम सांगळे यांनी. ते एक अभ्यासू, चिकित्सक व दूरदृष्टी व बहुमुखी प्रतिभेचे धनी असलेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून राज्यात सुपरिचित आहेत. आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना, समस्यांना धाडसाने न्याय दिला. वेळप्रसंगी छातीवर वारही झेललेत. ते म्हणजे, आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री असलेले अजब व्यक्तिमत्व आहे. प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, की आताचे अतिवेगवान असे डिजिटल मीडिया असो, या सर्व प्रसारमाध्यमांत ते अधिकारवाणीने वावरले, नवनवे प्रयोग केले, आणि ही सर्व माध्यमे आपल्या धाडसी व चमत्कारिक म्हणावी अशा पत्रकारितेने गाजवून सोडली. आधुनिक पत्रकारांच्या पिढीला विधायक पत्रकारितेची त्यांनी दिलेली शिकवण खरोखरचं स्तुत्य आहे. आपल्या अभ्यासपूर्ण, प्रखड आणि खोलात जाऊन वास्तव उकरत मांडलेल्या सडेतोड लिखानामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा चाहतावर्ग राज्यात निर्माण झाला. त्यांची राजकारणापासून ते समाजकारण, शिक्षण एवढेच काय, आध्यात्म आणि सिनेमा या विषयांवरदेखील मजबूत पकड आहे. आताच्या आर्टिफिशिअल इन्टिलिजन्सपासून ते स्वामी विवेकानंदांच्या कृतीशील धर्मप्रसारावर ते तितक्याच अधिकारवाणीने लिहू आणि बोलू शकतात.
प्रसारमाध्यमांचे काम हे लोकांना शहाणे करून सोडणे आहे, असे लोकमान्य टिळक म्हणत असतं. सांगळे यांना एक संपादक-पत्रकार म्हणून अभ्यासले असता, त्यांच्यात लोकमान्यांची सडेतोड लेखनी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक सुधारणांची कणव असे दोन्ही वैचारिक बिंदू आढळून येतात. ते मला नेहमी सांगत असतात, पत्रकारितेच्या चारस्तंभांपैकी तीन स्तंभ किडू शकतात, परंतु पत्रकारिता नाही. एकाचवेळी सर्व पत्रकार विकत घेण्याची ऐपत भविष्यात कोणत्याच राजकीय हुकुमशाहात नसेल. निर्भीड आणि सत्यासाठी किंमत मोजणारी पत्रकारांची पिढी या देशात जन्माला येतच राहील, कारण हा बुद्ध, महावीर आणि विवेकानंदांचा-गांधींचा देश आहे. पत्रकारिता हे पैसा कमाविण्याचे माध्यम नाही, ते सतीचे वाण आहे. जनसामान्यांना पत्रकारांचा आधार वाटतो, राजसत्ता आणि नोकरशाही यांना पत्रकारांचा धाक वाटतो, हा धाक कायम राहायला हवा. अधिकारीवर्गावर श्री सांगळे यांची चांगली पकड आणि जनसंपर्क का आहे? याचे गूढ त्यांच्या वर्तवणुकीत दिसते. चांगले अधिकारी त्यांचे आपोआप मित्र तर भ्रष्ट अधिकारी त्यांचे टोकाचे शत्रू होतात. या शत्रूंच्या छाताडावर त्यांची लेखनी आणि वाणी जी नाचते, ते पाहणे म्हणजे पत्रकारितेचा निव्वळ कस आणि पर्वणी असतो. म्हणूनच, श्री सांगळे म्हणजे धाडसी, निर्भीड आणि समाजहितैषी पत्रकारिता करू इच्छिणार्या उदयोन्मुख पत्रकारांसाठी चालते बोलते विद्यापीठ आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून पत्रकारिता कशी करावी, हे जर शिकायचे असेल तर श्री सांगळे यांच्याशिवाय पर्याय नाही.
श्री सांगळे यांनी पत्रकारिता करताना प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता, निर्भीड आणि सदसदविवेकबुद्धीने नव्या वाटा चोखळल्या, काहीप्रसंगी आपली वाट आपणच निर्माण केली. सर्वसामान्य म्हणजे ‘कॉमन माणूस’ हा त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू राहिला. त्याला न्याय देण्यासाठी त्यांचे सर्वाधिक शब्द व्यवस्थेशी भांडले, लेखनीची तलवार बनली. राज्यातील बहुतांश नामवंत मीडिया हाऊसेसमध्ये ते निवासी किंवा कार्यकारी संपादक होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. ते संपादकांच्या खुर्चीवर असेपर्यंत त्या वृत्तपत्राचा दैनंदिन अंक हा वाचनीय आणि लोकांना आपला वाटणारा असायचा. प्रसारमाध्यमांच्या तीनही क्षेत्रात अधिकारवाणीने मुशाफिरी करण्यासाठी त्यांनी गलेलठ्ठ पगाराची, मोठ्या मीडिया हाऊसेसमधील संपादकपदाची नोकरी सोडली, आणि नवनवे प्रयोग हाती घेतले, त्या प्रत्येक प्रयोगात देदीप्यमान यशच मिळवून दाखवले. एकीकडे पत्रकारांना नोकर्या नाहीत, अशी ओरड होत असताना हा माणूस चांगल्या पगाराच्या व परमानंट नोकर्या सोडतोच कसा? याचे आजही अनेकांना आश्चर्य वाटत राहते. पत्रकारिता करीत असतांना त्यांनी कधीही काळ आणि वेळ पाहिली नाही. पत्रकारितेच्या कर्तव्य, उत्तरदायित्व आणि वास्तवाची सखोल व व्यापक जाण ठेवून त्यांनी हे माध्यम आपल्या अस्तित्वाने गाजवून सोडले. त्यामुळेच ते जेथे गेले तेथे आदरास पात्र तर ठरलेच, परंतु मालक व्यवस्थेचे ‘डार्लिंग ऑफिसर’देखील ठरलेत.
साधना न्यूज टीव्ही असो, की ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपच्या डिजिटल प्रसारणाचे संपादकत्व असो, श्री सांगळे यांच्या नेतृत्वात काम करताना आधुनिक माध्यमांचे बारकावे, लोकभावनेचा कल आणि परिणामकारक पत्रकारिता याबद्दल उदंड शिकायला मिळाले. बातमीचे गांभीर्य, एडिटींग, आणि लोकांपर्यंत ती नेण्याचे अचूक टायमिंग या सर्व बाबीतील बारकावे त्यांच्या सानिध्यामुळेच शिकता आले. श्री सांगळे हे केवळ पत्रकारितेतील माझे मार्गदर्शकच नाही तर जीवलग बालमित्रदेखील आहेत. मीडिया, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने व चार्जिंग स्टेशन विपणन) क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय आणि सामाजिक व वैचारिक उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग, या सर्व क्षेत्रात ते अधिकाराने वावरत असतात. तावून सुलाखून निघालेले सोने जसे उजळून निघते, आणि आपली चमक निर्माण करते, तसे पत्रकारितेतील अस्सल बावणकशी सोनं म्हणजे पुरूषोत्तम सांगळे होय.
– संतोष थोरहाते
– संपादक-संचालक, ब्रेकिंग महाराष्ट्र (डिजिटल प्रसारण) मुंबई
– मुख्य संपादक, निर्भीड सारथी, हिवरा आश्रम
संपर्क 9923209658
————-