– कोकण विभाग राज्यात अव्वल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल
पुणे (सोनिया नागरे) – बहुप्रतीक्षित असा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी १२ वाजताच ऑनलाईन जाहीर झाला. एक तास अगोदरच विद्यार्थ्यांना निकाल दिसायला लागल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल असून, गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. या निकालामध्ये यावर्षीदेखील मुलींनीच बाजी मारली. यावर्षी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षा दिला होती. त्यापैकी फक्त ९३.८३ टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती विभागाचा निकाल ९३.२२ टक्के लागला असून, नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९६.८१ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सातव्या स्थानी होता, यावेळी तो सहाव्यास्थानी आल्याने निकालात सुधारणा झाली आहे. वाशीम जिल्हा ९५.१९ टक्क्यांसह विभागात पहिला तर सर्वात कमी निकाल (९१.४९ टक्के) यवतमाळ जिल्ह्याचा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.९०, अकोला ९३.६२, तर अमरावती जिल्ह्याचा निकाल ९२.९२ टक्के लागला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात यशाचा ठसा उमटवला असून, मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.८७ टक्के इतकी आहे. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के इतकी आहे. या निकालामध्ये कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. कोकण विभागातील ९८.११ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के इतका निकाल जाहीर झाला असून, पुणे विभागाचा निकाल ९५.६४ टक्के इतका लागला आहे.
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती.
उत्तीर्णतेची टक्केवारी ३.१८ टक्क्यांनी घसरली
– २०२३- ९३.८३
– २०२२- ९६.९४
– २०२१- ९९.९५
– २०२०- ९५.३० (कोरोना महामारीच्या आधी)
– एकूण २३०१३ शाळांपैकी ६८४४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
– दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामगिरी सरस ठरली आहे.
– मुलींचा निकाल ९५.८७ टक्के तर मुलांचा निकाल ९२.०५ टक्के लागला.
—————–