BULDHANAHead linesKhamgaonVidharbha

जादादराने सोयाबीन बियाणे विक्री भोवली; खामगावातील अंकुर कृषी केंद्राचा परवाना निलंबीत!

खामगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्‍याला जादा भावाने सोयाबीन बियाणे विकल्याप्रकरणी खामगाव येथील सरकी लाईनमधील अंकुर कृषी केंद्राचा परवाना काल, १ जूनरोजी निलंबित करण्यात आला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलाच पाठपुरावा केला होता. या संदर्भातील वृत्त सर्वप्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केले होते.

खामगाव येथील सरकी लाईनस्थित अंकुर कृषी केंद्र येथून ३१ मेरोजी तालुक्यातील नागापूर येथील शेतकरी पिंटू लोखंड़कार यांनी केड़ीराम चंदा सोयाबीन बियाण्याच्या ३६०० रुपये प्रती बॅगप्रमाणे दोन बॅग खरेदी केल्या व संबंधित दुकानदाराने दोन बॅगचे ७२०० रुपयांचे बिलदेखील दिले. परंतु शेतकरी लोखंड़कार यांचे म्हणण्यानुसार, सदर दुकानदाराने प्रती बॅग ६०० रुपये जादा घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्याम अवथळे व इतरांना याबाबतची माहित होताच तातड़ीने ते दुकानात येत सदर दुकानदाराला चांगलेच धारेवर धरले व तालुका कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री देसले यांना याबाबत अवगत केले. श्रीमती देसले यांनी येवून दुकानाची झाड़ाझड़ती घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारेदेखील लगेच अंकुर कृषी केंद्रावर पोहोचले व पंचनामा करत सदर कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस वरिष्ठांकडे केली.

तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी तालुकास्तरीय पथकामार्फत सदर कृषी केंद्राची तपासणी केली. यामध्ये अंकुर कृषी केंद्र यांनी शेतकरी लोखंड़कार यांच्याकड़ून जादा पैसे घेतल्याचे आढळून आले. तसेच सोयाबीन खरेदी-विक्रीचा तपसील नसणे, साठा व भावफलक अद्यावत नसणे यासह इतर त्रुटी आढळून आल्याने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी अंकुर कृषी केंद्र खामगाव यांचा बियाणे विक्रीचा परवाना १ जूनरोजी निलंबित केला आहे. अंकुर कृषी केंद्र यांचेकड़ून शेतकर्‍याला जादा भावाने सोयाबीन बियाणे विक्रीचा विषय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलाच लावून धरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!