– असमाजिक तत्वांकडून सामाजिक शांततेच्या उल्लंघनाची शक्यता पाहता प्रशासन सज्ज!
मेहकर/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर शहरात दोन गटात तणाव निर्माण होण्याची व दंगल घडवून आणण्याची शक्यता पाहाता, व तशी माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्याने, प्रतिबंधात्मक आदेश म्हणून मेहकर शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
शहराच्या हद्दीतील सीमादेखील सील केल्या गेल्या आहेत. तर फिरण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. हा आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांनी काल, दि. २४ नोव्हेंबर रोजी जारी केला आहे.
सदर आदेशात नमूद आहे की, महसूल प्रशासनाला मेहकर शहरात दोन गटात दंगल होणार असल्याबाबतची माहिती दि. २४ नोव्हेंबर रोजी मिळाली आहे. त्या अनुषंगाने मेहकर शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी मेहकर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील, मेहकर शहर नगरपालिका हद्दीत दि. २४ नोव्हेंबरपासून पुढील आदेशापावेतो कलम १६३ नुसार मनाई हुकूम लागू करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण मेहकर शहरातील नगरपालिका हद्दीत पुढील आदेशापर्यंत इसमांना मेहकर नगरपरिषद हद्दीत फिरण्यास मज्जाव करण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच नगरपरिषद हद्दीत येण्या व जाण्याससुद्धा मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश दि. २४ नोव्हेंबररोजी उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र जोगी यांनी जारी केला आहे.
