वर्धा (प्रकाश कथले) – शहरातील मुख्य रस्त्यावर गणेशमंदिरासमोर थांबून विघ्नहत्याचे दर्शन घेत असलेल्या भाविकावर काल पहाटे तीन वाजता काठीने हल्ला करून त्यांच्याजवळील रोख रक्कम लंपास करणार्या पाच जणांच्या टोळीला शहर पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केलेल्यांत यश गोपी बैसवार (वय २१) रा.वर्धा तसेच चार विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. आज शहर पोलिस ठाण्यात अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची माहिती दिली. यावेळी वर्ध्याचे ठाणेदार सत्यवीर बंडिवार उपस्थित होते.
शहरातल्या मुख्य रस्त्यावर गणेशमंदिराजवळच या थरारक हल्ल्यात विजय गुलाबचंद कुलधरिया रा.हवालदारपुरा, हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या नाकाच्या हाडाचा चुराडा झाला तसेच डोक्यालाही मार लागला. त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पाच जणांची टोळी हैदोस घालत एमएच ३२ एए ५४४९ क्रमांकाच्या दुचाकीने सावज शोधत भटकत होती. शहरातल्या मुख्य रस्त्यावर हल्ला करून त्यांनी केलेल्या लूटमारीने शहरात दहशतच निर्माण झाली होती.गणेशमंदिरात सकाळी भाविक दर्शनास येतात. त्यांच्यातही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पण पोलिसांनी काही तासांतच अटक केल्याने नागरिकांनीही पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले. ही पाच जणांची टोळी १८ मे रोजी रात्री ११ वाजता दुचाकीने निघाली होती. त्यांनी पहिल्यांदा नागसेननगरातील दोन इसमांना मारहाण करीत त्यांच्याजवळील ५०० रुपये तसेच मोबाईल लंपास केला होता. त्यानंतर कारला गावाजवळील रस्त्यावर एका ट्रकवर हल्ला केला. घाबरलेल्या ट्रकचालकाने त्याचा ट्रक शहराकडे वळवीत शहरातील मुख्य मार्गावर आणून थांबविला. पण लूटमार करणारी ही टोळी ट्रकचा पाठलाग करीत शहरातील मुख्य रस्त्यावर आली. याचवेळी विजयचंद गुलाबचंद कुलधरिया गणपती मंदिरात रस्त्यावर थांबून दर्शन घेत होते. त्यांच्याजवळ येत या टोळीतील एकाने कुलधरिया यांना पैशाची मागणी केली. काही घडायच्या आतच एकाने त्याच्याजवळी लाकडी दांड्याने विजयचंद कुलधरिया यांच्यावर हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्याजवऴील ३ हजार रुपये हिसकावून घेत त्यांनी पळ काढला. काही अंतर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा दुचाकी वळविली. पण विजयचंद कुलधरिया स्वत:ला सावरत कसे बसे घरी पोहोचले. रक्तबंबाळ झालेले विजयचंद कुलधरिया घरीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले.
दरम्यान माजी नगरसेवक कमलकिशोर कुलधरिया यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे, ठाणेदार सत्यवीर बंडिवार तातडीने घटनास्थळी पोहोचले. काल सकाळपासूनच उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे, ठाणेदार सत्यवीर बंडिवार परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहात होते. त्यात लूटमार करणारे हल्लेखोर चेहरा झाकून असले तरी काठीने हल्ला करताना स्पष्ट दिसत होते. अखेर पोलिसांना काही तासांतच हल्लेखोरांची ओळख पटवीत त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांजवळून लूटलेला मोबाईल,रोख रक्कम,लूटमार करण्यास उपयोगात आणलेली दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांच्या निर्देशाप्रमाणे उपनिरीक्षक सलाम कुरेशी,हवालदार नितीन रायलकर,किशोर पाटील,दिनेश तुमाने,अनुप राऊत,राधाकिशन घुगे,राहुल भोयर,दिनेश आंबटकर,श्याम सलामे यांनी केली.