– टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार – तुपकर
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ज्याप्रमाणे सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना हमीभाव दिला जातो. त्याप्रमाणे भाजीपालावर्गीय पिकांनाही हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. तसेच, टोमॅटोला भाव मिळत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांमार्फत टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचेदेखील तुपकर म्हणालेत.
टोमॅटोचे कोसळलेले भाव आणि इतर शेतीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी दिशा शेख म्हणाल्या, की स्वतःच्या खुर्चीचे चार पाय टिकावेत म्हणून सरकार काहीही करायला तयार आहेत. परंतु, शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी हे सरकार काहीच करायला तयार नाही. टोमॅटोला मिळणार्या अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतकरी मरणाच्या दारात मात्र सरकार बघ्याची भूमिका घेते. आत्महत्या केल्यावर लाख रुपयांचा चेक घेऊन फोटो काढल्यापेक्षा आत्महत्या करू नये, म्हणून आधीच काही पॅकेज द्यावे. शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल, असे मतदेखील दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.
यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, मुधकर शिंगणे यांनीदेखील सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतात टोमॅटो पीक घेतले. त्यांना एक किलोचा उत्पादन खर्च ८ ते १० रुपये आला. त्यानुसार जवळपास २ लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. परंतु, आजरोजी टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याची खंत रविकांत तुपकर यांनी व्यक्त करून, भाजीपाला वर्गीय पिकांनादेखील हमीभाव देण्याची मागणी केली. टोमॅटो पिकाला भाव मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा इशारादेखील त्यांनी दिला.
यावर्षी हवामानातील सततच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर अवकाळी पावसाने रब्बीतील हातातोंडाशी आलेला शेतकर्यांचा घास हिरावून घेतला. त्यानंतर गारपिटीने भाजीपाला व पळ पिकांचे प्रचंड नुकसान केले. अशातच आता तापमानात झालेला प्रचंड वाढीमुळे टोमॅटो,भाजीपाला, कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. तसेच दूध उत्पादनातही मोठी घट होत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे. तरी सरकारने तातडीने कांदा, टोमॅटो, भाजीपाला व दुध उत्पादकांना अनुदान द्यावे. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरची बाकी असलेल्या शेतकर्यांची नुकसान भरपाईची मदतही तातडीने जमा करावी.
– रविकांत तुपकर, शेतकरी नेते
—————