– काळ्या मातीवर पिलर उभे केले, बांधकामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे बांधकाम सुरू असून, या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने अवैध रेतीचा वापर चालविला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. तसेच, हे बांधकामदेखील गुणवत्तापूर्ण होत नसल्याचे दिसून येत असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने या बांधकामाची गुणवत्ता चाचणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत ग्रामपंचायत सदस्य पुरूषोत्तम पडघान यांच्यासह सुज्ञ ग्रामस्थ पालकमंत्री, शिक्षणमंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या सीईआंकडे लवकरच तक्रारी दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
मेरा बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या काही खोल्या जीर्ण झाल्याने अचानक पडल्या होत्या. शाळा सुरू होण्यापूर्वी ही दुर्देवी घटना घडली होती. सद्या शाळेची इमारत शिकस्त झालेली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा समितीच्या विनंतीनुसार, शाळा खोल्यांचे बांधकाम सुरू केले आहे. तथापि, या बांधकामासाठी अवैध रेतीचा वापर केला जात असून, कामही निकृष्टदर्जाचे होत आहे. चक्क काळ्या मातीवर कॉलम उभे करण्यात आले असून, बांधकामात पुरेसे सिमेंटही वापरले जात नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित मुख्याध्यापकांना व ठेकेदारालाही ग्रामपंचायत सदस्य पुरूषोत्तम पडघान व ग्रामस्थांनी सूचना केली होती. परंतु, या सूचनेकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील संबंधित ठेकेदार व मुख्याध्यापकांना बांधकाम गुणवत्तापूर्ण होत नसल्याचे सांगितले, परंतु या दोघांनीही या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत सदस्य पुरूषोत्तम पडघान यांच्यासह काही ग्रामस्थ आता शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रारी करणार असल्याची माहिती हाती आली आहे.