Pachhim Maharashtra

प्रतापकाकांच्या विरोधात भाजपचे पॅनल पडण्याची शक्यता बळावली!

– सहकार विभागाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर, १८ जूनला मतदान, १९ जूनला मतमोजणी

शेवगाव, जि. नगर (बाळासाहेब खेडकर) – तालुक्यतील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. हा कारखाना सद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांच्या ताब्यात आहे. कारखाना निवडणुकीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे हे पॅनल टाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी प्रतापकाकांना राजकीय रणनीती आखावी लागणार असून, आगामी विधानसभा निवडणूक पाहाता, आ. मोनिका राजळे यांनीदेखील कारखाना ताब्यात घेण्यासाठी राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. अरूण मुंडे यांचे वडिल हे या कारखान्याचे संस्थापक, संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपचे पॅनल पडण्याची शक्यता वर्तविली जात असून, मतदारदेखील भाकरी फिरविण्याच्या मानसिकतेत असल्याने प्रतापकाकांना डोळ्यात तेल घालून या निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

संघर्षयोद्धा तसेच माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी राजकीय व सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून केदारेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन केला होता. हा कारखाना आतापर्यंत ढाकणे कुटुंबीयांच्याच ताब्यात आहे. आता कारखान्याच्या संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ साठीची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करणे १५ ते १९ मे, दि. २२मेरोजी छाननी, दि. २३ रोजी अर्ज मागे घेणे, दि. ७ जून चिन्ह वाटप करणे, दि. १८ जून मतदान तर दि. १९ जूनरोजी मतमोजणी होणार आहे. बोधेगाव गट २, हातगाव ३, मुंगी ३, चापडगाव ३, हसनापूर २, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रतिनिधी १, महिला प्रतिनिधी २, इतर मागासवर्ग १, भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागासप्रवर्गातील १, अशा संचालक मंडळाच्या एकूण १९ जागेसाठी हा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी मिलिंद भालेराव, तथा प्रादेशिक सह संचालक साखर, अहमदनगर डॉ. पी एल खंडागळे सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ प्रवीण लोखंडे यांनी जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग येत असून, सध्या हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या ताब्यात आहे. प्रमुख विरोधक भाजपच्या आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे या कारखाना निवडणुकीत काय भूमिका घेवून निवडणुकीची रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरुण मुंडे यांचे पिताश्री संस्थापक संचालक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव ढाकणे यांच्या विरोधात भाजपचे पॅनल करणार का, असा सवाल व्यक्त होत आहे. प्रतापराव ढाकणे हे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यंदा नवीन चेहर्‍यांना संधी देणार की, विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मात्र भाकरी फिरवण्याची मोठी गरज असल्याचे सभासदातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!