अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री दोन गटात तुफान दगडफेक होऊन तिचे पर्यावसन दंगलीत झाले. या दगडफेक आणि दंगलीमध्ये एकाचा मृत्यू तर १० ते १५ जण गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच, अनेक वाहनांची तोडफोड झाली असून, त्यात चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे. दरम्यान, या हिंसाचाराचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवित ३० जणांना अटक केली असून, शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
दुसरीकडे, अकोल्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या दंगलीमध्ये दहा ते २० जण जखमी झाले असून, तीन ते चार पोलिसही जखमी झालेले आहेत. काही ठिकाणी दुकानांनाही आग लावण्यात आली. दरम्यान, शहरातली स्थिती पाहता शहरात १४४ कलम लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. सध्या शहरात परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.
#महाराष्ट्र के अकोला में हिंसक मारपीट और पथराव में 1 की मौत।
धारा-144 लागू।
दंगा भड़काने के आरोप में 25 लोग गिरफ्तार।#Maharashtra #Akola #MaharashtraPolice #Violence pic.twitter.com/P4gBhSpAvA
— Modi Fan (@Lucknowkibaat32) May 14, 2023
इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर ३० जणांना अटक करण्यात आली असून, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अमरावती व वाशिममधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे. शहरात शांतता रहावी, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘घटनास्थळी अकोला पोलीस एका तासानंतर पोहोचली. पोलिसांनाच ही दंगल घडवुन आणायची होती का? कर्नाटक निकालानंतर संभाजीनगरप्रमाणे भाजपाने अकोल्यात दंगल घडवली आहे का, याची नि:पक्ष चौकशी गृह विभागाने करावी व आमच्या जिल्ह्यात शांतता कायम ठेवावी’, असे आवाहनही आ. मिटकरी यांनी केले आहे.
—————