सोलापूर (संदीप येरवडे) – छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय हे सिव्हिल हॉस्पिटल नाही. हे तर डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय यांच्याशी संलग्नित असलेले हॉस्पिटल असल्याची मोठी माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल म्हणणे हे सध्या अधिष्ठता यांना खटकत आहे, असेच म्हणावे लागेल.
डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय येथे शेकडो विद्यार्थ्यांना दररोज वैद्यकीय शिक्षण दिले जाते. उद्याचे डॉक्टर घडविण्याचे काम या महाविद्यालयातून होते. परंतु लोकांचा असा गैरसमज निर्माण झाला आहे की केवळ रुग्णसेवा हेच आमचे उद्दिष्ट आहे. मुळात शिक्षण देऊन येणार्या रुग्णाला उपचार करणे हा हेतू आहे. परंतु शिक्षण बाजूला सारून केवळ रुग्णसेवेचे काम सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले जात आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण देण्याचा उद्दिष्ट बाजूला सारला जात आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास ३०० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील १९ विभाग आहेत. त्याचे काम मोठे आहे. याबरोबरच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटरशीप करणारे डॉक्टर याची संख्यादेखील मोठी आहे. जवळपास सर्व डॉक्टर मिळून ७०० जणांचा स्टाफ आहे. त्याबरोबरच सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्पेशलिस्ट डॉक्टरांची आवश्यकता आहे. या स्पेशलिस्ट डॉक्टरसाठी लागणारे जे काही उपकरणे आहेत ते देखील शासनाकडून पुरवले तर भविष्यात आणखीन चांगले काम करता येऊ शकेल.
या स्पेशलिस्टमुळे वेगवेगळ्या आजारावर उपचार करता येणार आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला विनामूल्य सेवा देता येणार आहे. तसेच सध्या ए ब्लॉक ही इमारत खूपच जुनी झाली आहे. ही इमारत पाडून नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. यासाठी देखील निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ही केवळ शंभराच्या आसपास होती. परंतु आता ३०० विद्यार्थी या मेडिकल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्यासाठी बांधण्यात आलेले जे होस्टेल आहे त्याची जागा खूपच कमी पडत आहे. तेथील सोयी सुविधा देखील अपुरे पडत आहे. त्यामुळे तेथील बांधकाम देखील होणे गरजेचे आहे. त्याचे प्रस्ताव शासनाकडे देण्यात आले आहे. परंतु जोपर्यंत निधी मिळणार नाही तोपर्यंत काम करता येणार नाही, असे याप्रसंगी अधिष्ठता डॉ. देशमुख यांनी सांगितले.