चिखली (तालुका प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (दि.६) शहरातील मौनीबाबा संस्थान येथे बळीराजा पॅनेलच्या मतदारांसाठी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अडते व व्यापारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते माजी पालकमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या चिखली बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील बळीराजा पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक माजी आ. राहुल बोंद्रे यांनी एकहाती जिंकली आहे. त्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची कुशल नेतृत्व कामाला आले आहे. या बाजार समितीसाठी भरभरून मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा आभार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे नवनिर्वाचीत संचालकांनी सांगितले. शनिवारी (दि.६) दुपारी १२ वाजता मेळावा सुरू होणार असून, मेळाव्यानंतर मतदार व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचेदेखील आयोजन करण्यात आलेले आहे.
ही विळ्या भोपळ्याची मोट मोडित निघेल!
सोशल मीडियावर सद्या एक पोस्ट जोरदार व्हायरल होत असून, त्याची चिखली तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. जेव्हा एखाद्याला हरवणे शक्य नसते, तेव्हा त्याच्या विरोधात कटकारस्थाने केली जातात. ही विळ्या भोपळ्याची मोट मोडित निघेल, असे या पोस्टमध्ये नमूद आहे. श्वेताताईंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठलेला आहे. येणार्या काळात श्वेताताईंच्या झंजावाती विकासकार्यासमोर ही विळ्या भोपळ्याची मोट कोलमडून पडणार आहे, असेही या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
—————–