अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक!
– पक्षाच्या सरचिटणीसपदाचा आ. जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा
– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही पद सोडण्याच्या तयारीत?
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये १५ सदस्यीय कमिटीची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीला प्रदेशाध्यक्षांनाच बाेलावले गेले नाही, म्हणून बैठकीत कोणताही निर्णय हाेऊ शकला नाही. उद्या परत जयंत पाटलांसह बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान, निर्णय मागे घेण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा दबाव असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. काल ८२ वर्षीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून, पक्षात राजीनामासत्र सुरू आहे. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी एकमेव मागणी कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हेदेखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ सदस्यीय कमिटीची बैठक झाली. पक्षात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते तथा आमदार अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल या तिघांच्या नावावर अध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे. या तिघांपैकी कुणा एकाचे नाव पुढे येण्याची शक्यता असून, शरद पवार हेदेखील आपला निर्णय मागे घेतात की नाही, हे उद्या-परवा कळणार आहे.
दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची एक बैठक पार पडली. तसेच, शरद पवार हेदेखील सकाळी साडेदहा वाजता पक्षाच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांनी दुपारी एक वाजेपर्यंत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेतल्यात. या भेटीत त्यांनी निर्णय मागे न घेण्याचेच संकेत कार्यकर्त्यांना दिले आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हेदेखील सकाळपासून पक्ष कार्यालयात हजर होते. पक्षप्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले, की आपण शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी सांगितले, की फार विचारपूर्वक निर्णय घेतला आहे, नेतृत्व आणि अध्यक्षपद हे दोन वेगवेगळे विषय आहेत. पक्षाचा अध्यक्ष कुणीही झाले तरी पक्षाचे नेतृत्व माझ्याकडेच असेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर, ‘राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांचे नेतृत्व बघून आम्ही आलो. पवारांनी आम्हाला प्रेम दिले. काम करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने आम्ही नाराज आहोत.”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथील बैठकीला आपणास बोलावले नाही, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, समितीची आज बैठक झाली त्यात काही चर्चाही झाली. पण या बैठकीला आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे उद्या पुन्हा या संदर्भात चर्चा होईल, पण महाराष्ट्रात आणि देशभरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याला असे वाटत नाही की, शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडावे. शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे, असे पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.