बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक; तब्बल ३९५ आत्महत्या!
– ‘अवकाळी’नेही शेतकर्यांच्या गळ्याभोवती आवळला फास!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले तेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर केला होता. परंतु आत्महत्या तर कमी झाल्या नाहीत, उलट वाढल्या असून, बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी ३२० तर यावर्षी ४ महिन्यात ७५ शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकरी आत्महत्यांचा हा दुर्देवी उद्रेक जिल्हा पहिल्यांदाच पाहात आहे. शिवाय, आता अवकाळी पावसाने कहर केल्याने शेतकर्यांना आत्महत्यांच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचे भीषण वास्तव आहे.
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची घोषणा नवीन सरकारने केली खरी, पण शेतकर्यांना दिलासा मिळवून देण्यात शासन कमी पडल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांसाठी समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबवण्यात येतात मात्र त्याचा प्रभावी परिणाम झाला नाही. विशेष मदतीच्या कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी समृद्धी’ योजनेची अंमलबजावणी,शेतकर्यांसाठी अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा, शेती विकासाचे कार्यक्रम राबवणे, मुलांना मोफत शिक्षणाची योजना, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना यांसारख्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शेतीमालाला हमीभाव, पीएम-किसान व इतर योजनांमार्फत शेतकर्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली, असे सरकारचे म्हणणे आहे.पण शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकारला यश मिळालेले नाही. त्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. घरांची पडझड, वीज पडल्याने पशुधन व मनुष्य हानी झाली. हजारो हेक्टर पिकांची नासाडी झाली.शासनाने मदतीची घोषणा केली परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. २८ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसाने एका दिवसात ६५ गावे बाधित केली. जिल्ह्यातील सुमारे ५२२ हेक्टर पिक उध्वस्त झाले आहे. तत्पूर्वी २५ व २६ एप्रिल रोजी तब्बल ५७ गावे बाधित करून १३५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर आज रविवारी ३० एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने १११ गावे बाधित करून १०२८.२० हेक्टर वरील पिके उध्वस्त केली आहे.परिणामी शेतकरी आथिर्क विवंचनेत सापडला आहे.
कधी किती पाऊस?
बुलडाणा जिल्ह्यात सातत्याने पाऊस पडत आहे. ७ एप्रिल -१३ मिमी,१५ एप्रिल -२६ मिमी,२३ एप्रिल-१.५ मिमी,२६एप्रिल-०.५ मिमी, २७ एप्रिल-९ मिमी,२८ एप्रिल- १८ मिमी,२९ एप्रिल- २३.५ मिमी पाऊस पडला आहे.
अशी आहे आत्महत्यांची आकडेवारी..
एक जानेवारी २०२२ डिसेंबरदरम्यान एकूण ३२० शेतकरी आत्महत्या झाल्या. यापैकी ११५ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. १९८ प्रकरणी अपात्र ठरली असून ७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे. प्रत्यक्ष १०५ लाभार्थ्यांना मदत मिळाली आहे. यावर्षी जानेवारी २०२३ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ७५ शेतकरी आत्महत्या झाल्या.८ प्रकरणे पात्र ठरली तर ७ प्रकरणे अपात्र ठरली आहे. ६० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असून, ५ प्रकरणात प्रत्यक्ष मदत मिळाली आहे.
—————–