मेहकरात ‘इलेक्शन फिवर’ कायम; आता ‘खविस’साठी खा. जाधव, आ.रायमुलकरांची परीक्षा!
– १५ जागेसाठी २९ उमेदवार मैदानात, दोन जागा बिनविरोध
– शिंदे गट व महाविकास आघाडी पुन्हा आमने-सामने!
– खा. जाधव व आ.रायमुलकर ‘खविस’चा गड़ शाबूत ठेवणार? ‘मविआ’ची वज्रमूठ घट्ट?
बुलढाणा/मेहकर (बाळू वानखेडे) – मेहकर बाजार समितीच्या निवड़णुकीचा धुराळा खाली बसत नाही तोच, खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवड़णुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये १५ जागेसाठी २९ उमेदवार नशीब अजमावत असून, दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. या निवड़णुकीतही शिंदे गट व महाविकास आघाडी हे आमने-सामने उभे ठाकले आहेत. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी झालेली दमछाक पाहता, खा. जाधव व आ. रायमुलकर हे खरेदी-विक्री संघाची एकहाती सत्ता असलेला गड़ शाबूत ठेवणार का? याकडे जिल्ह्यासह मेहकर तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर महाविकास आघाडीने बाजार समितीत प्रवेश केला असला तरी, एकीची ही वज्रमूठ आणखी घट्ट आवळावी लागणार आहे. बाजार समिती निवड़णुकीत ‘सिलेक्टेड़’ मतदार ‘इलेक्टेड़ ‘ठरला असताना, ‘खविस’चा जाणकार मतदार आता कुणाला कौल देतो, याकडे राजकीय धुरिणांसह एरवी काही देणे घेणे नसलेल्या सर्वसामान्यांचेही लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसोबत मेहकर बाजार समितीसाठी निवड़णूक २८ एप्रिलरोजी पार पड़ली. या निवड़णुकीत खा.प्रतापराव जाधव व आ. ड़ॉ. संजय रायमुलकर यांची चांगलीच दमछाक झाली. बाजार समितीत सत्ता आली पण ‘प्रताप’गड़ाला चांगलेच हादरे बसले. येथे महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शिंदे गटाला जोरदार टक्कर देत, सात जागा जिंकल्या. बाजार समिती निवड़णुकीचे खरे तर राजकीय वादळ शांत होत नाही तोच तालुका खरेदी विक्री संस्थेच्या निवड़णुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवड़णुकीत १५ जागेसाठी २९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये वैयक्तिक मतदारसंघातून ११ जागेसाठी २१ उमेदवार, महिला राखीवमधून दोन जागेसाठी चार उमेदवार, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून एका जागेसाठी दोन तर ओबीसीमधून एका जागेसाठी दोन उमेदवार नशीब अजमावत आहेत. सहकारी संस्थांमधून शिवसेना तालुका प्रमुख सुरेश विश्वनाथ वाळूकर तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीमधून राजेंद्र प्रल्हाद वानखेडे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.
बाजार समिती निवड़णुकीत खा.जाधव व आ. रायमुलकर यांना महाविकास आघाडीने चांगलीच लढत दिली. गेल्या २५ वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या या बाजार समितीत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आशीष दिलीपराव राहाटे यांच्या नेतृत्वात एकीने लढत देत महाविकास आघाडीने सात जागा खेचून आणत प्रवेश केला. या निवड़णुकीत सिलेक्टेड़ मतदार हा इलेक्टेड़ ठरल्याचे दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार-खासदार हे दोघेही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चालत्या गाड़ीत बसल्याचा राग मतपेटीतून व्यक्त तर केला गेला नाही ना? याबाबतही चवीने चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेची शकले पड़ल्यानंतर बाजार समितीसाठीची पहिलीच निवड़णूक झाली. एरवी जिल्हा परिषद निवडणुकीत कधीकाळी एका जागेवर स्टॉप घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तर या निवड़णुकीत माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात लक्ष घातल्याने व महाविकास आघाडीच्या भक्कम साथीने पाच जागा जिंकून येथे सहकारात पाय ठेवला. तर उमेदवार कोणत्या पक्षाचा यापेक्षा एकीने लढण्याचे फळ महाआघाडीला मिळाले. तुमच्यामुळे आमच्या अंगावर सहकारातील गुलाल पड़ला, असे मेहकरातील काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित संचालकाला फोनवर अभिनंदन करताना मनाचा मोठेपणा दाखवत कबूल करून आनंद व्यक्त केला. येथे आशीष राहाटे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी एकजुटीने लढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आगामी निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे खा. जाधव व आ. रायमुलकर हे ओळखून असल्याने आता खरेदी-विक्री संघाच्या निवड़णुकीत त्यांनीही जोरदार तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे, त्यांना मानणारा मोठा मतदार या निवडणुकीत आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
खरेदी-विक्री संस्थेतील मतदारांची संख्या चार हजाराच्यावर असून, यात मयत मतदारांची संख्या बरीच आहे. खरेदी विक्री संघाचे बहुतांश मतदार हे शेतकरी असून, जाणकार असणारा हा मतदार कोणाला कौल देतो, याकड़े धुरिणांसह एरवी काही देणेघेणे नसलेल्या सर्वसामान्यांचेही लक्ष लागून आहे. दिवसेंदिवस प्रचाराला जोर येत असून, प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या निवड़णुकीसाठी ९ मेरोजी मतदान होणार असून, निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून जी. पी. साबळे तर सहाय्यक निवड़णूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन फाटे हे काम पाहत आहेत.