अनुदान टप्प्याच्या बाहेर १३७ शाळा; त्रुटी पूर्ततेसाठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३६१ शाळांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी जवळपास २२४ शाळा पात्र ठरल्या आहेत. तर १३७ शाळा या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या शाळांना आता महिनाअखेर पर्यंत त्रुटी पुरतेसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांनी त्रुटीची पूर्तता न केल्यास अनुदानाच्या टप्प्याच्या बाहेर जाणार आहेत.
शासनाच्या २०, ४० व ६० टक्के तसेच वैयक्तिक शिक्षकांच्या अनुदानाच्या टप्प्यांचा गोंधळ गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हा गोंधळ शिक्षणाधिकारी जावेद शेख हे आल्यानंतर कमी झाला आहे. आतापर्यंत आठवी ते दहावीच्या २० टक्क्येच्या सहा शाळा पात्र झाल्या आहे. २० ते ४० टक्केच्या २१ शाळा पैकी १२ शाळा पात्र झाल्या आहेत तर ९ अपात्र झाल्या आहेत. २० टक्क्यावरून ४० टक्के अनुदानासाठी आठवी ते दहावीच्या २१ शाळांपैकी १८ शाळा पात्र झाल्या आहेत तर जवळपास तीन शाळा अपात्र झाल्या आहेत.
आठवी ते दहावीच्या २० ते ४० टक्के अनुदानासाठी १६ शाळा होत्या त्यापैकी १० शाळा पात्र झाल्या असून तर ६ शाळा अपात्र झाल्या आहेत. आठवी ते दहावीच्या ६० टक्के अनुदानासाठी पात्र असलेल्या जवळपास ९१ शाळा आहेत. त्यापैकी ८४ शाळा पात्र झाल्या असून ७ शाळा अपात्र झाल्या आहेत. पाचवी ते सातवीच्या ६० टक्के अनुदानासाठी ६२ शाळा आहेत. त्यापैकी ५० शाळा पात्र झाल्या आहेत तर १२ शाळा अपात्र झाल्या आहेत. वाढीव तुकडी अनुदानासाठी ९२ असून त्यापैकी ६३ अपात्र झाल्या आहेत. पाचवी ते सातवीच्या ३४ शाळा पैकी जवळपास २१ शाळा अपात्र झाल्या आहेत तर उर्वरित १३ शाळा या पात्र झाल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ३६१ शाळा पैकी २२४ शाळा पात्र झाल्या आहेत तर १३७ शाळा या अपात्र झाल्या आहेत. या शाळांना त्रुटी लावल्याने या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सध्या संस्थास्तरावर धावपळ सुरू झालेली आहे. या शाळांच्या त्रुटीमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे आधार अपडेट न करणे, रोस्टर तपासणी न करणे, प्रस्तावात शेवटच्या वर्गाची पटसंख्या नसणे, सेवक संच मान्यता नसणे आदी कारणामुळे त्रुटी काढण्यात आल्या आहेत.
सध्या अनुदानाचा टप्पा देण्याचे काम बर्यापैकी झाले आहे. महिनाअखेर पर्यंत उर्वरित शाळांना आणि शिक्षकांना अनुदानाचे पत्र देण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांच्या अप्रोलबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या आहेत.
– जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी