समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक भीषण अपघातात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पीच क्युरेटर प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी; पत्नी सुवर्णा जागीच ठार
– रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून स्वयंपाक बनविणे जीवावर बेतले!
लोणार/बिबी (ऋषी दंदाले) – भरधाव असलेली क्रेटा कार फ्लायओव्हरजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर जाऊन आदळली. हा भीषण अपघात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेहकरजवळील कल्याणानजीक घडली. या अपघातात पुण्याहून नागपूरकडे जाणारे विदर्भ क्रिकेट असाेसिएशनचे पीच क्युरेटर तथा माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर (वय 59, रा. नागपूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पत्नी सुवर्णा हिंगणीकर या जागीच ठार झाल्या आहेत. स्वतः कार चालविणारे प्रवीण हिंगणीकर यांना अत्यवस्थ अवस्थेत पाेलिसांनी मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाला असून, आयशर ट्रक चालक व वाहक हे जेवण बनविण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबल्याने हा अपघात घडला असल्याचे दिसते. प्रविण हिंगणीकर यांची नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डवर क्युरेटर म्हणून निवड झाली होती.
पुण्यावरून नागपूरला जात असलेले हिंगणीकर दाम्पत्य हे शिर्डीहून समृद्धी महामार्गावर आले. क्रेटा कारने (क्रमांक एमएच ३१- ६६२२) प्रवास करत असताना प्रवीण हिंगणीकर (वय ५९) हे स्वतः कार चालवत होते, तर त्यांच्या पत्नी सुवर्णा या शेजारी बसलेल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार कल्याणा (ता.मेहकर) जवळ आली असता फ्लायओव्हरवर हिंगणीकर यांच्याकडून कारचे नियंत्रण सुटले व ते रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर ट्रकवर अतिशय वेगात जाऊन आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की वाहन अक्षरशः चक्काचूर झाले तर पती-पत्नीपैकी पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले होते. घटनेचे गांभीर्य पाहता व माहिती मिळताच मेहकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तातडीने रूग्णालयात हलवले. प्रवीण हिंगणीकर यांच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त पती-पत्नी हे शिर्डीवरून नागपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समृद्धी महामार्गावरील कल्याणानजीक एका फ्लाय ओव्हरच्या खाली एक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रकचे चालक आणि वाहक हे स्वतःच्या जेवणासाठी स्वयंपाक करण्यासाठी थांबले होते. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गावर वाहने थांबवण्यास मनाई आहे. तरीही अनेक ट्रकचालक कुठलीही भीती न बाळगता समृद्धी महामार्गावर गाडी थांबवून स्वयंपाक करून आपल्या जेवणाची व्यवस्था करत असतात. अशा प्रकारचा हा तिसरा अपघात असल्याने पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.
——————-