शेतकर्यांना गंडविणार्या गाढेबंधुंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या!
शेतकर्याने पिकवले, व्यापार्याने गंडवले!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – शेतकरी आधीच अस्मानी सुलतानी संकटाने हैराण झाला आहे. त्यात व्यापारीदेखील शेतकर्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दरम्यान, चिखली पोलीस ठाणे हद्दीत शेतकर्यांची फसवणूक करणार्या व पसार झालेल्या व्यापारी गाढेबंधुंसह त्यांच्या साथीदाराच्या मलकापूर येथून बुलढाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींनी शेतकर्यांकडून ८१ लाख ६१ हजार ९३० रुपयांचा शेतमाल खरेदी करुन, शेतमालाचा मोबदला न देता, शेतकर्यांची फसवणूक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१५ एप्रिलरोजी संजय साहेबराव शिंदे रा. मकरध्वज खंडाळा ता. चिखली यांच्या फिर्यादीवरुन चिखली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी संतोष मनोहर गाडे इतर दोघे (हरदेव ट्रेडर्स एम.आय.डी.सी. चिखली) यांनी नियोजीतपणे कट रचून, शेतकर्यांकडून तुर, सोयाबीन, चणा, गहू असा शेतमाल खरेदी करुन, त्यांचे पैसे आरटीजीएसव्दारे देण्यात येतील, असे सांगून शेतकर्यांचा विश्वास संपादन करुन, शेतकर्यांकडून ८१ लाख ६१ हजार ९३० रुपयांचा शेतमाल खरेदी केला. मात्र शेतमालाचा मोबदला न देता, शेतकर्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान, आरोपीतांचा शोध घेणे सुरु असतांना, गुन्ह्यातील आरोपी संतोष मनोहर गाडे, अंकुश मनोहर गाडे, सुदर्शन भगवान येळवंडे सर्व रा. मकरध्वज खंडाळा ह.मु. पुंडलीकनगर, चिखली हे रेल्वेने भुसावळ येथून मलकापूर शहरात येथे येत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरुन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरीत रेल्वे स्टेशन मलकापूर येथे जावून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना प्रथम श्रेणी न्यायालय, चिखली येथे हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपीतांचा ७ दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. गुन्ह्यातील पीडित शेतकरी यांचे शेतमाल विक्री बाबत झालेली फसवणूक रक्कम व गेलेला माल हस्तगत करणेसाठी कारवाई करण्यात येत असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
चिखली येथील बाजार समितीतील भुसार व शेतमालाचे व्यापारी संतोष गाढे, अंकुश गाढे आणि त्यांचा साथीदार येळवंडे या तिघांनी मिळून जिल्ह्यातील जवळपास ३०० शेतकर्यांचा शेतमाल घेऊन पैसे दिले नाहीत. शेतमाल खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आणि त्यांनी गावातून पोबारा केला होता. दुसरीकडे, वकिलांमार्फत कोर्टात प्रकरण दाखल करून स्वतःला नादर घोषित करण्यासाठी त्यांनी कायदेशीर हालचालीही चालविल्या होत्या. याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर व चिखलीतील शेतकर्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवड यांची भेट घेऊन गाढेबंधुंना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर १५ एप्रिलरोजी गाढे बंधुंसह त्यांच्या साथीदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच, हे प्रकरण बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले होते.
यांनी केली कारवाई!
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबी प्रमुख अशोक लांडे, पोनि. माधवराव गरुड, सपोनि. मधुसुदन घुगे, पोउपनि.गजानन मोरे, पोलीस अंमलदार अविनाश भांबळे, सुरेश हरणे, संजय शेळके, सरदार बेग, अविनाश जाधव, राजेंद्रसिंग मोरे, निलेश वाघमारे, एजाज खान, जितेंद्र झाडोकार आर्थीक गुन्हे शाखा – बुलढाणा यांच्या पथकाने वरील यशस्वीरित्या पार पाडली आहे.
नादर घोषित करून पैसे बुडविण्याचा गाढेबंधुंचा डाव फसणार का?
शेतकर्यांचे शेतमाल खरेदीपोटी आपल्याकडे १० कोटी रुपये आहेत, अशी कबुली या आरोपींनी यापूर्वीच जाहीर प्रगटनाद्वारे दिली आहे. तसेच, त्यांनी याबाबत न्यायालयात खटलादेखील दाखल केलेला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी आक्षेप नोंदविलेला आहे. त्यामुळे स्वतःला नादर घोषित करून पैसे बुडविण्याचा गाढेबंधुंचा डाव फसणार की नाही? याबाबत शेतकरीवर्गात काळजी लागून आहे. गाढेबंधुंसह त्याच्या साथीदारांची संपत्ती विका पण शेतकर्यांचे पैसे द्या, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेली आहे.
—————-