अजित पवारांसोबत ४० आमदार?
– भाजपसोबत जाण्याची शक्यता अजित पवारांनी फेटाळली!
– नॉट रिचेबल असलेले धनंजय मुंडे मुंबईत, भाजपनेते मंगलप्रभात लोढा यांची घेतली भेट
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी मुंबईत सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे दादांच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, दादांनी प्रसारमाध्यमे देत असलेल्या बातम्या खोट्या व निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवसेना (ठाकरे) नेते खा. संजय राऊत यांनीदेखील भाजप व शिंदे गटाकडून अशा बातम्या पेरल्या जात असून, महाविकास आघाडी खीळखिळी करण्याचा हा डाव आहे. अजित पवार कुठेही जाणार नाही, असे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे खा. राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवार हे आज आपल्या विधीमंडळातील कार्यालयात बसून असून, राष्ट्रवादीचे एक एक आमदार त्यांची भेट घेत आहेत. तर कालपासून नॉट रिचेबल असलेले दादांची अत्यंत विश्वासू आ. धनंजय मुंडे हे मुंबईत पोहोचले असून, त्यांनी सकाळी भाजपचे नेते तथा मंत्री व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील मुंडे यांनी दिला नाही. तथापि, राष्ट्रवादीचे ४० आमदार अजितदादांसोबत असून, त्यांच्या सह्या झाल्या असल्याची खात्रीशीर माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सूत्राने दिली आहे. याबाबतचे वृत्तदेखील एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसारित केले होते. दुसरीकडे, अजित पवार हे निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत, अशी माहिती देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मुद्द्यावर बाेलणे टाळले.
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते खा. संजय राऊत म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केली. महाविकास आघाडी भक्कम आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अजित पवार बंड करणार नाहीत. अजित पवारांबाबत येत असलेल्या बातम्या पूर्ण खोट्या आहेत. भाजपकडून या अफवा पसरवल्या जात आहे. २०२४ पर्यंत महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचे भाजपचे हे प्रयत्न आहेत. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा पक्ष पूर्णपणे शरद पवारांशी बांधिल आहे. अजित पवारांबाबत ज्या बातम्या येत आहेत, त्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. अजित पवार भाजपमध्ये जाणार, या बातम्या पूर्ण खोट्या आहेत. भाजपकडून या अफवा, वावड्या पसरवल्या जात आहेत. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ आमदारांपैकी ४० जण अजित पवारांसोबत आहेत. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांनी स्वत: या ४० आमदारांशी संपर्क साधला आहे’, असा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राने केला आहे. तसेच, अजित पवारांनी या ४० आमदारांची एका समंतीपत्रावर स्वाक्षरीदेखील घेतली असून, वेळ येताच राज्यपालांकडे ही यादी सुपूर्द केली जाणार आहे, असा खळबळजनक दावाही या वृत्तपत्राने केला. त्यामुळे अजित पवार हे पक्षातील आमदारांचा एक गट घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. बातमीत पुढे म्हटले आहे की, राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही लागू शकतो. यात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होण्याची शक्यता अधिक आहे. असे झाल्यास सरकार कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे हा निकाल येण्यापूर्वीच अजित पवारांना आपल्या गोटात खेचण्याची भाजपची ही खेळी आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याला हिरवा झेंडा दाखवलेला नाही. दोघांकडून मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन मिळताच अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतील.
अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आ. धनंजय मुंडे हे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. मंत्रालयातील लोढा यांच्या कार्यालयातील धनंजय मुंडे यांचे फोटो समोर आले असून, लोढा यांच्या भेटीनंतर मुंडेंनी अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली व चर्चा केली. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
शरद पवारांनी बाळगले मौन!
या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन बाळगले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या घेण्यासाठी त्यांना फोन करून बोलावत आहेत, मात्र शरद पवार यावर काहीही बोलत नाहीत, असे सूत्राचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांची बंडखोरी दिसून आली तेव्हा शरद पवार यांनी पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बोलावून एकत्र राहण्याचे आवाहन केले होते. मात्र आजच्या घडीला शरद पवार यांचा अजूनही फोन आलेला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्राने सांगितले.