सोलापूर (संदीप येरवडे) – कांदा अनुदान मिळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शेतकर्यांची गर्दी होत असून, आतापर्यंत १६ हजार शेतकर्यांनी अनुदानासाठी अर्ज दाखल केले आहेत. शासनाने अर्ज भरण्यासाठी २० एप्रिल अंतिम तारीख दिल्याने शेवटच्या आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत.
राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. कांद्याचे दर कोसळल्याने हा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आर्थिक मदत मिळावे या हेतूने ३५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. सध्या हे अनुदान मिळावे यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी बोगस पावत्या देखील जोडत असल्याची चर्चा सध्या बाजार समितीमध्ये होत आहे. परंतु विशेष म्हणजे प्रामाणिक शेतकरी जे खरोखरच कांद्याची लागवड केली होती आणि कांद्याची विक्री केली आहेत, अशा शेतकर्यांना शासनाचे अनुदान मिळावे ही भावना बाजार समितीसह सर्वांचे आहे. परंतु यामध्ये काही प्रमाणात बोगसगिरी सुरू असल्याने त्या अर्जाची पडताळणी व्यवस्थित केली तर बोगस अर्ज बाहेर पडणार आहेत.
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला गर्दी केली नव्हती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून बाजार समितीमध्ये अर्ज भरण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. यासाठी सोलापूरच्या बाजार समितीने पाणी, मंडप, अर्ज तसेच इतर सोयी सुविधा शेतकर्यासाठी करून दिले आहेत. सध्या कांदा उत्पादक शेतकर्यांचे अर्ज भरून घ्यायचे महत्त्वाचे काम असल्यामुळे जवळपास बाजार समितीने ४५ कर्मचार्यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. हे अर्ज व्यवस्थित घेता यासाठी सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, पुणे, लातूर, तुळजापूर असे प्रत्येक जिल्ह्याचे टेबल वेगवेगळे केले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना अर्ज देता येत आहे. शेतकर्यांसाठी २० एप्रिल मुदत दिली असली तरी आणखीन मुदतवाढ मिळावी, यासाठी शेतकर्यांची मागणी होत आहे. परंतु शासन स्तरावर काय निर्णय होतो त्यावर अवलंबून आहे.
सध्या कांदा अनुदान चे काम महत्त्वाचे आहे. बर्यापैकी कर्मचार्यांची नियुक्ती अर्ज स्वीकारण्यासाठी लावले आहे. शेतकर्यांनी परिपूर्ण अर्ज भरून कागदपत्रे जोडले तर अर्ज बाद होणार नाही.
– चंद्रशेखर बिराजदार, सचिव सोलापूर बाजार समिती