सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या जवळपास ९३ रूग्णांना सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने १३ लाख ९५ हजाराच्या निधीची मदत केली आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून दरवर्षी दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत दिली जाते. या आजारामध्ये प्रामुख्याने किडनीचे विकार, हृदयरोग, कॅन्सर आदी रोगांचा समावेश करण्यात आला आहे. हा आजार इतका गंभीर आहे की यामध्ये ज्या कुटुंबातील व्यक्तीला हा आजार जडला आहे त्या कुटुंबातील सदस्य मदतीसाठी इकडे तिकडे सैरावैर फिरतात. परंतु कोणत्याही प्रकारे मदत मिळत नसल्यामुळे खूप अडचणी येतात. परंतु सोलापूर जिल्हा परिषदेने सेस फंडातून या गंभीर आजारासाठी खास बाब म्हणून सेस फंडातून प्रत्येकी १५ हजार रुपयाची तरतूद केली आहे. त्यामुळे रुग्णाला काही प्रमाणात का होईना उपचारासाठी मदत होते.
दरम्यान सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे जवळपास १५८ रुग्णाचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास ९३ रुग्णाचा प्रस्ताव पात्र झाला आहे. तर ६५ रुग्णाचा प्रस्ताव अपात्र करण्यात आला आहे. हे प्रस्ताव अपात्र करण्मागचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे अपुरे असणे, काही आजार योजनेत न बसणे, दुबार प्रस्ताव अशा कारणामुळे देखील हे प्रस्ताव अपात्र करण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाला या गंभीर आजारावर उपचारासाठी समाज माध्यमातून आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच शासनाने देखील या आजारासाठी आणखी निधीची तरतूद करण्याची मागणी केली जात आहे.
दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी प्रस्ताव दाखल करावा!
जे रूग्ण दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य विभाग यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावेत. तो प्रस्ताव पाहून संबंधित रुग्णाला त्वरित आर्थिक मदत दिली जाईल.
– डॉ. सोनिया बागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
—————-