सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जल जीवन मिशन योजनेच्या जवळपास १८९ कामांमध्ये अनियमितता झाली आहे. त्याचा अहवाल आला असून दोषीवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
जल जीवन मिशन योजनेच्या कामातील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला आहे. जल जीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये झालेल्याअनिमितता प्रामुख्याने मर्यादेपेक्षा अधिक काम देणे, पर जिल्ह्यातील ठेकेदारांना काम देणे, अपात्र ठेकेदाराला पात्र करणे, एकाच ठेकेदाराला अधिक कामे देणे आदी प्रमुख मुद्द्यावर अनिमितता झाली असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याची पडताळणी कोहिनकर यांनी करीत असल्याचेही सांगितले. याबरोबर शेतकरी कामगार पक्षाने कंत्राटी स्थापत्य असलेल्या बाबत तक्रार केली असून त्याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे जे स्थापत्य कंत्राटी आहेत तेच जल जीवन मिशन योजनेचे काम घेतले असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
राज्यस्तरीय चौकशी करावी!
जल जीवन मिशन योजनेच्या कामाची जिल्हास्तरीय चौकशी समितीवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे राज्यस्तरीय समितीकडून चौकशी करावी. तसेच जल जीवन मिशन योजनेच्या कामातीलअनिमितता ही केवळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यामुळे झाली असून त्यांना हजर करून घेऊ नये.
– बाबासाहेब कारंडे, शेकाप सदस्य
ग्रामसेवक पुरस्कारात वशिलेबाजी नाही!
ग्रामसेवकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामसेवकाचा घ्यायचा याबाबत कोणत्याही प्रकारे वशिलेबाजी न करता पात्र ग्रामसेवक आहे त्याचाच प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी दिली.