– अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांची परीक्षा केंद्रांवर भेटी, कस्टोडीयम सेंटरची केली पाहणी
सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – बारावीच्या गणित विषयाच्या पेपर फुटीप्रकरणी अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा निलिमा टाके यांनी ८ मार्चरोजी साखरखेर्डा येथील कस्टोडीयम सेंटरची पाहणी केली, तसेच काही परीक्षा केंद्रांवर भेटीसुध्दा दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एका आरोपीला एसआयटीने शेंदूर्जन येथून अटक केली असून, अटकेतील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे.
लोणार, बिबी, राजेगाव येथील परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपी प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी सात आरोपींना अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित आणखी काही संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक पाठविण्यात आले आहे. तर दि.९ मार्चरोजी आणखीन एका आरोपीची त्यामध्ये भर पडली. त्यापैकी शेंदूर्जन येथील नवीन आरोपीला साखरखेर्डा पोलिसांना अटक करण्यामध्ये यश आले. त्यामध्ये अटक केलेल्या आठव्या आरोपीचे नाव दानिश खा फिरोज खा पठाण (वय २१) असे आहे, आणि आणखी वाढण्याची शक्यता ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी वर्तवली आहे.
तत्पूर्वी अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा निलिमा टाके यांनी ८ मार्चरोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेतील कस्टोडियम सेंटरची सखोल तपासणी करीत पाहणी केली. त्याचबरोबर साखरखेर्डा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांचीसुध्दा भेट घेतल्याचे समजते. साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, जिजामाता विद्यालय, राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ विद्यालय, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, बिबी येथील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होतो का, याची पाहणी करत परीक्षा सुरु असतांना धावती भेट घेतली. त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर प्रत्येक परीक्षा केंद्रावरुन रनर किती मिनिटांत परत येतो याची साखरखेर्डा येथे उपस्थित राहून पाहणी केली. काल ८ मार्च रोजी पोलीसांनी काही शिक्षकांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.
जिल्हा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी बजावले निलंबनाचे आदेश!
पेपरफुटी व सामूहिक कॉपी प्रकरणी वच्छगुलाब बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संचालक तथा कर्मचारी गोपाल दामोदर शिंगणे, यशवंतराव चव्हाण स्कुल व कनिष्ठ विद्यालयायाचे संचालक गजानन शेषराव आडे, डॉ. झाकीर हुसेन विद्यालयाचे प्राचार्य शेख अकील शेख मुनाफ, आणि लोणार येथील एका खासगी संस्थेत कार्यरत शिक्षक अंकुश पृथ्वीराज चव्हाण या चार शिक्षकांना संस्था संचालकांनी निलंबित करावे, असा आदेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी संबंधित संस्थेला पाठविला आहे. यातील तीन शिक्षक हे संस्थाचालकच असल्याने त्यांना हा आदेश कितपत लागू होतो, याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. हा संस्था विनाअनुदानीत असल्याने हे शिक्षक निलंबीत केले गेले नाही तर मात्र या संस्थांची मान्यताच धोक्यात येणार आहे.
—————