– राज्याच्या अर्थसंकल्पावरून ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, शेतकरी नेते रविकांत तुपकरांची घणाघाती टीका!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा म्हणजे बड्या बड्या बाता अन शेतकर्यांना लाथा आहे. मूळ प्रश्न सोडवायचे नाही त्याला बगल द्यायची आणि माध्यमात हेडलाईन घ्यायची, अशी सरकारची नीती दिसते. खरे तर अशा घोषणांचे, अर्थसंकल्पाचे ऑडिट झाले पाहिजे, अशा शब्दांत शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. तसेच, या अर्थसंकल्पाबाबत माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजाचे आमदार ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही संताप व्यक्त करत, हा धार्मिक उन्मादाकडे नेणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प जाहीर केला असून, यातील घोषणा भविष्यात किती पूर्ण होतील? अर्थसंकल्प धार्मिक उन्मदाकडे नेणारा आहे का? याची शंका असल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, की शहरी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या अशी आमची मागणी राहिली आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला तर शेतकर्यांना दोन पैसे मिळतील. तो द्यायचा नाही आणि घोषणांचा पाऊस पडायचा. यांच्या घोषणा उद्या पुन्हा जाचक अटीत अडकणार नाहीत कशावरून? यापूर्वी भाजप सरकारच्या कार्यकाळात जाहीर केलेली कर्जमाफी कशी झाली आहे ते पहा. रात्री रात्री बायका पोरासगट शेतकरी अर्ज भरण्यासाठी ताटकळत उभा केला. २०१४ पासून आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय घोषणांचे सत्यशोधन झाले तर सत्य कळेल. पीकविम्याची रक्कम शेतकर्यांना द्या ना, पण ती दिली जात नाही. सोयाबीन ७० टक्के शेतकर्यांच्या घरात पडून आहे, भावच नाही. यासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंब केला. सरकारच लक्ष वेधले मात्र केंद्राकडे पाठपुरवठा करायला राज्य तयार नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे नुसत्या बड्या बड्या बाता आहेत, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली.
तर डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणालेत, की जाहीर झालेला २०२३ चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा संपूर्णपणे येणार्या निवडणुकीचा अर्थसंकल्प असल्याचं स्पष्टपणे दिसून येते. ह्या निवडणुका नेमक्या कोणत्या लोकसभा, विधानसभा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याचा अंदाज सध्या बांधता येत नसला तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे हे स्पष्ट आहे. उपुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या आजच्या भाषणात राज्यातील देव, देवस्थाने, तीर्थक्षेत्र याचा विकास, राज्यातील थोर संत, महापुरुष यांच्या स्थळांचा विकास, विविध समाजाचे होऊन गेलेल्या थोर पुरषांच्या नावाने सुरू असलेल्या योजना यांचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु खर्या अर्थाने आज राज्यावर मोठयाप्रमाणावर कर्जाच डोंगर असतांना करोडो अब्जो रुपयांच्या लोकप्रिय घोषणा भविष्यात किती पूर्ण होतील, याबाबत मलाच नव्हे तर राज्यातील जनतेलाही शंकाच आहे. घोषणा करतांना त्यांनी कुठलीही आकडेवारी दिली नाही फक्त करू, करणार एवढेच ते बोलले. मागे अजितदादा पवार अर्थमंत्री असतांना त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली होती. त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृतची घोषणा करण्याचा याठिकाणी प्रयत्न केला आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा म्हणून ५० टक्के निधी देण्याची त्यांनी जी घोषणा केली त्याच मी याठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाची देखील घोषणा करण्यात आली, खर बघितलं तर ती अगोदरच झालेली आहे, परंतु प्रश्न असा आहे की हे महाविद्यालय पूर्णतः शासकीय राहणार की खासगी-सार्वजनिक भागिदारी तत्वावर (पीपीपी) ते मंजूर करणार याबाबत स्पष्टता केलेली नाही. जिल्ह्यात संत्रा प्रकल्प उभारणार तो नेमका कुठे उभारणार, त्यासाठी नेमकी किती तरतूद करण्यात आली. याची देखील स्पष्टता नाही. समृध्दी महामार्गावरून विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगावला चारपदरिने जोडणार याची देखील त्यांनी घोषणा केली, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. परंतु विषय असा आहे की ह्या नुसत्या घोषणा न राहता वर्षभरात ही कामे मार्गी लागली पाहिजे ही अपेक्षा आहे. या अर्थ संकल्पामुळे जिल्ह्यातील जनता किती समाधानी झाली हे मी सांगू शकणार नाही. परंतु राज्याच्या दृष्टीने विचार केल्यास जाहीर झालेला हा अर्थ संकल्प खर्याअर्थाने धार्मिक उन्मदाकडे नेणारा अर्थ संकल्प आहे की काय? अशी शंका मला येत आहे. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी या अर्थसंकल्पात खर्या अर्थाने काही नाही. पंतप्रधान यांनी २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा केली होती त्यादृष्टीने राज्य सरकार काही योजना जाहीर करेल अशी अपेक्षा मला होती परंतु त्यादृष्टीने काहीच घोषणा करण्यात आली नाही. खर्या अर्थाने सांगायचं झाल तर नुकत्याच ज्या विधानपरषदेच्या निवडणुका झाल्या व जी कास्ााब्याची पोट निवडणूक झाली त्यामध्ये आलेलं अपयश बघून जनतेसमोर जाण्यासाठी केलेल्या ह्या लोकप्रिय घोषणा आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या लोकप्रिय घोषणा असून, ह्या अगोदरच तोट्यात असलेल्या आपल्या राज्याला अजून कर्जाच्या दरीत ढकलणारा अर्थ संकल्प आहे, अशी जोरदार टीका डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.
———————-